भगुर-राहुरी : ऊसाच्या शेतात भरदिवसा बिबट्याची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 03:34 PM2020-08-03T15:34:03+5:302020-08-03T15:34:26+5:30
भरदिवसा बिबट्याने मुक्तपणे संचार केल्याने तो अनेकांच्या नजरेस पडला आणि त्यामुळे अधिक घबराट पसरली.
नाशिक : भगूर-राहुरी शिवारातील मळे भागात रविवारी (दि.२) भरदिवसा बिबट्याने एका शेतातून दुसऱ्या शेतात धावाधाव करत दर्शन दिल्याने शेतकऱ्यांची भंबेरी उडाली. भगूर भागात पुन्हा बिबट्याचा संचार वाढल्याचे यामुळे अधोरेखित झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने धाव घेत पाहणी करून पिंजरा लावण्याची तजवीज केली.
दारणा नदीकाठालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम असून, या भागातील नाशिक परिक्षेत्रांतर्गतच्या गावांमध्ये अद्याप सात बिबटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. रविवारी संतोष रामदास सानप यांच्या शेतात बिबट्या मुक्तसंचार करत असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, वनरक्षक विजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून शेतकºयांना सतर्कता बाळगत सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले. तसेच तत्काळ या भागात शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धतीने पिंजरा तैनात करण्यात आला आहे. भरदिवसा बिबट्याने मुक्तपणे संचार केल्याने तो अनेकांच्या नजरेस पडला आणि त्यामुळे अधिक घबराट पसरली. नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षितेच्यादृष्टीने वनविभागाने सांगितलेल्या सूचना व उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी केले आहे.