भगुरचे भूमापन कार्यालय कुलूप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:13 AM2021-02-07T04:13:48+5:302021-02-07T04:13:48+5:30
भगुर नगर परिषद अखत्यारित दीड ते दोन हजार घरे, इमारती असून त्यांचे उतारे, जागा नकाशे देऊन शासकीय मोजणी करून ...
भगुर नगर परिषद अखत्यारित दीड ते दोन हजार घरे, इमारती असून त्यांचे उतारे, जागा नकाशे देऊन शासकीय मोजणी करून देणे, रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी भगुरला स्वतंत्र सिटीसर्व्हे कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र, काही वर्षापासून हे कार्यालय आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार दोन दिवस काही तास उघडे असायचे. आता मात्र पूर्णत: बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. भगुरच्या नागरिकांना घर, इमारतीचे रेकॉर्ड कागदपत्रे घेण्यासाठी नाशिकरोड जवाहर मार्केटमधील कार्यालयात जावे लागते.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भगुरच्या कार्यालयासाठी नियुक्त असलेल्या भूमापन कर्मचाऱ्याकडे नाशिकरोडचाही पदभार देण्यात आला असून, नाशिकरोडच्या कामकाजाबरोबरच अनेक वेळा मोजणीसाठी अन्यत्र जावे लागत असल्याने त्यांनी भगुरकडे पाठ फिरविली आहे. भूमापन विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे भगुरसाठी स्वतंत्र भूमापन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
(फोटो ०६ भगुर) भगुरमधील बंद असलेले सिटीसर्व्हे कार्यालय