साळी समाजाचे आद्य दैवत भगवान जिव्हेश्वर पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:46 AM2018-08-28T00:46:45+5:302018-08-28T00:47:07+5:30
साळी समाजाचे आद्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांचा जयंती सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. नाशिक शहर स्वकुळ साळी समाज पंचमंडळ व श्री जिव्हेश्वर युवक उत्कर्ष संस्था यांच्यातर्फे जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : साळी समाजाचे आद्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांचा जयंती सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. नाशिक शहर स्वकुळ साळी समाज पंचमंडळ व श्री जिव्हेश्वर युवक उत्कर्ष संस्था यांच्यातर्फे जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता जुने नाशिक साळी वाडा येथील जिव्हेश्वर मंदिरात जयंती उत्सवास सुरुवात झाली. त्यावेळी साळी समाज महिला मंडळाने भगवान जिव्हेश्वरांची विधिवत पूजा करून सकाळी ९ वाजता फुलांची आकर्षक सजावट करून श्री भगवान जिव्हेश्वरांची पालखी सोहळा व शोभायात्रा सुरू झाली. जुने नाशिकमार्गे शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा नेण्यात आली. यात सर्वात लक्षवेधी विविध देवदेवता, सिंह, वृषभ यांचे विविध प्रकारचे नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ठरले. प्रत्येक चौकात पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी व शोभायात्रा जुने नाशिक संभाजी चौकातील श्री गणपती मंदिरात येऊन सांगता झाली. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंचमंडळाचे अध्यक्ष मोहन गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुनील साळी, युवाध्यक्ष सचिन कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी या उत्सवाचे संयोजन केले. भगवान जिव्हेश्वर यांचा जन्म झाला त्यावेळेस श्रावण शुद्ध ही तिथी असल्यामुळे हा दिवस जन्म उत्सवासाठी मानला जातो. याबाबत अशी अख्यायिका आहे की, संसाराची निर्मिती झाल्यावर लज्जा रक्षणासाठी सर्व देवदेवता यांनी भगवान शंकराकडे याबाबत आपली व्यथा व्यक्त केली. त्यावेळेस भगवान शंकराने आपल्या जिव्हेद्वारे (जीभेतून) भगवान श्री जिव्हेश्वर यांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांचे नाव जिव्हेश्वर झाले. त्यामुळे वस्त्रोद्योगाचे आद्यप्रवर्तक म्हणूनही भगवान जिव्हेश्वरांना ओळखले जाते.