सिन्नर येथे उद्यापासून भैरवनाथ महाराज यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:11 AM2018-03-29T00:11:34+5:302018-03-29T00:11:34+5:30
येथील ग्रामदैवत व परिसरात जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास दमनक चतुर्दशीपासून शुक्रवारी (दि. ३०) प्रारंभ होत आहे. समितीच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सिन्नर : येथील ग्रामदैवत व परिसरात जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास दमनक चतुर्दशीपासून शुक्रवारी (दि. ३०) प्रारंभ होत आहे. समितीच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळपासून रथ व कावडी सवाद्य मिरवणूक होणार आहे. सकाळी सहा वाजता ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते रथपूजन करण्यात येऊन मिरवणुकीस ढोल-ताशा व टाळ-मृदंगाच्या गजरात सुरुवात होणार असून गंगावेस, लालचौक, महालक्ष्मी रोड, खडकपुरामार्गे शहराच्या जवळपास सर्वच रस्त्यावरून रथोत्सव व गंगाजलांच्या कावडींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. रथ मिरवणुकीपुढे त्र्यंबकबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी भजनी मंडळाची दिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी सहाला सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू असते. शहरातील पाचोरे कुटुंबीयांकडे रथ हाकण्याचा मान असतो. रथाच्या दोन्ही बाजूने भालदार चोपदार उभे राहून देवाच्या मूर्तीस चौराने वारा घालतात. रथाला बैलजोड्या जुंपण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चढाओढ असते. त्यासाठी बैलांना पोळ्याच्या सणाप्रमाणे स्वच्छ धुवून व सजवून मिरवणुकीच्या मार्गावर सज्ज ठेवतात. रथामागे सहभागी झालेल्या कावडीधारकांच्या स्वागतासाठी पाट मांडण्यात येऊन त्यावर त्यांचे पाय धुवून पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच कावडीधारकांना गूळ-खोबरे, पेढे, साखरफुटाणे देण्यात येतात. रथयात्रा संपूर्ण गावापासून सूर्यास्तापर्यंत भैरवनाथाच्या पटांगणात येते. याठिकाणी कावडीधारकांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. कावडीतील गोदावरीच्या पाण्याने भैरवनाथ मूर्तीस अभिषेक घातला जातो. मंदिराभोवती दिव्यांची रोषणाई करण्यात येते. मुला-मुलींसाठी खेळणी व मिठाईची दुकाने थाटण्यास प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजता शोभेच्या दारूची आतषबाजी होणार आहे. त्यानंतर रात्री पुणे येथील दत्ता महाडिक यांचा लोकना ट्याचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. मंदिराच्या प्रांगणात भाविकांच्या मनोरंजनासाठी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात येते. भरलेल्या यात्रेत भाविक व ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होते. यात्रोत्सवात परिसरातील अनेक गावांतील भाविक, कावडीधारक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यात्रेत मेवा-मिठाई, खेळणीच्या दुकानांतून मोठी आर्थिक उलाढाल होते. शनिवारी (दि. ३१) म्हणजे यात्रेच्या दिवशी कुस्त्यांची दंगल होणार आहे. बारादारी येथे सायंकाळी ५ वाजता राज्यभरातील नामवंत मल्ल हजेरी लावणार आहेत.
भाविकांची लगबग, मंदिराजवळ सांगता येथील भैरवनाथ महाराज यात्रेतील रथाला श्रीफळ वाढवून दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडते तर आपल्या बैलाचा खांदा रथाच्या जोत्याला लावून रथ ओढण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू असते. सजवलेल्या बैलांना रथास जुंपल्यावर थोडासा रथ पुढे सरकला की, दुसरा शेतकरी बैल घेऊन हजर राहतो. हीच लगबग दिवसभर सुरू असते. रात्री मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता करण्यात येते.