ग्रामदैवत भैरवनाथांची साध्या पद्धतीने महाआरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:43 PM2020-04-08T23:43:53+5:302020-04-08T23:44:33+5:30
लॉकडाउनमुळे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आली. तथापि, देवस्थानचे प्रमुख हभप त्र्यंबकबाबा भगत यांच्यासह निवडक पाच जणांच्या उपस्थितीत यात्रेनिमित्त भैरवनाथ महाराज मंदिरात साध्या पद्धतीने मंगळवारी पहाटे पूजा-अर्चा करण्यात आली.
सिन्नर : लॉकडाउनमुळे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आली. तथापि, देवस्थानचे प्रमुख हभप त्र्यंबकबाबा भगत यांच्यासह निवडक पाच जणांच्या उपस्थितीत यात्रेनिमित्त भैरवनाथ महाराज मंदिरात साध्या पद्धतीने मंगळवारी पहाटे पूजा-अर्चा करण्यात आली.
गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू असलेली यात्रा कुठल्या कारणाने रद्द होण्याची ही पहिलीच वेळ होती. दरवर्षी यात्रेसाठी बाहेरगावाहून मोठ्या संख्येने भाविक सिन्नरमध्ये येत असतात, मात्र कोरोना संकटात संपूर्ण देश लढत असताना त्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून यात्रा रद्द करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने मंदिराला यापूर्वीच कुलूप लावण्यात आलेले आहे. भाविकांनी घरातूनच ग्रामदेवतेचे नामस्मरण, पूजन करावे. घरातच राहून कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन हभप त्र्यंबकबाबा भगत, कृष्णाजी भगत व विश्वस्तांनी केले होते. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास विवेक भगत यांच्या हस्ते भैरवनाथ महाराजांच्या मूर्तीला दुग्ध व जलाभिषेक घालण्यात आला. तर मंगळवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास पूजेला सुरु वात करण्यात आली. हभप त्र्यंबकबाबा भगत, विलास भगत यांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी चार पुरोहित उपस्थित होते.
यात्रा रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेतल्यानंतर मंदिरात दर्शनासाठी न येता घरातच नामस्मरण करण्याचे आवाहन विश्वस्तांनी केले होते. तरीही सिन्नर पोलिसांनी मंदिर परिसर सील केला होता. नवा पूल, सरस्वती पुलासह आजूबाजूच्या भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या विनंतीला अव्हेरून काही नागरिक सकाळी मंदिर परिसरात आले खरे, मात्र त्यांना पोलिसांकडून उठाबशांचा प्रसाद मिळाला.