चांदवडला महामार्गावर भजन-कीर्तन
By admin | Published: June 6, 2017 01:45 AM2017-06-06T01:45:21+5:302017-06-06T01:45:29+5:30
चांदवड : येथे शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी किसान क्रांती मोेर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होत चांदवडमध्ये शंभर टक्के बंद पाळण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : येथे शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी किसान क्रांती मोेर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होत चांदवडमध्ये शंभर टक्के बंद पाळण्यात आला. सोमवारी चांदवडचा आठवडे बाजार असतो. चांदवडच्या इतिहासात पहिल्याच आठवडे बाजार बंद ठेवून किसान क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी सुमारे दोन तास मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. वारकरी संप्रदायाच्या वतीने टाळ-मृदंगाच्या तालावर कीर्तन सादर करून आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. आजच्या बंदमध्ये व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी, रिक्षाचालकांनी सहभाग नोंदविला. मात्र अत्यावश्यक सेवा मेडिकल्स व दवाखाने बंदमधून वगळण्यात आली होती. गेल्या पाच दिवसांपासून चांदवड तालुक्यात शेतकरी संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भाजीपाला व दुधाचा पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सोमवारचा आठवडे बाजार बंद ठेवून गावकऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला.
सकाळी ९ वाजेच्या सुमारास किसान क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गणेश निंबाळकर, राम बोरसे, समीर काळे, नितीन थोरे, प्रकाश चव्हाण, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन अहेर, संजय जाधव, शांताराम ठाकरे, युवा नेते राहुल कोतवाल, नवनाथ अहेर, अनिल कोतवाल, शिवाजी कासव, प्रकाश शेळके, किसान सभेचे अॅड. दत्तात्रय गांगुर्डे, कॉ. भास्कर शिंदे, संपतराव जाधव, मारोती ठोंबरे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गणेश ठाकरे, भाऊसाहेब शेलार, देवीदास शेलार, जगन्नाथ घुमरे, शंकरराव जाधव, बी. बी. देवरे, सुरेश निकम, सुभाष शिंदे, नंदकुमार कोतवाल, आदेश शेळके, सुभाष शेळके आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा सरकार डाव आखत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संजय जाधव, गणेश निंबाळकर, कॉ. भास्करराव शिंदे, नितीन अहेर यांची भाषणे झाली. शेतकरी क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची दिशा राज्य व जिल्हास्तरावरून ज्या पद्धतीने आदेश येतील तसे आंदोलन करण्याचे ठरले. चांदवड बंदमुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.