भजन गायनाने रसिकांची सायंकाळ भक्तिमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:45 AM2019-03-13T00:45:36+5:302019-03-13T00:46:04+5:30
गुरू परमात्मा परेशू, ऐजा ज्याचा दृढ विश्वासू’ ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे’ आदी विविध भजनांसह विविध अभंगांच्या गायनाने नाशिककर भक्तिरसात चिंब झाले.
नाशिक : ‘गुरू परमात्मा परेशू, ऐजा ज्याचा दृढ विश्वासू’ ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे’ आदी विविध भजनांसह विविध अभंगांच्या गायनाने नाशिककर भक्तिरसात चिंब झाले.
निमित्त होते, दिवंगत बेजॉन देसाई यांच्या जयंतीनिमित्त जयम फाउंडेशनतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये आयोजित ‘अभंगसंध्या’चे. प्रारंभी गणेश वंदनेचे सादरीकरण झाल्यानंतर विविध भावगीते, भक्तिगीतांसह संत कबिरांचे दोहे, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी संत परंपरेतील विविध अभंगांचे सादरीकरण केले़ त्यांना तबल्यावर अमेय ठाकू र, संवादिनीवर अमित पाध्ये, पखवाज हनुमंत रावडे, सिंथेसायझरसह झंकार कानडे यांनी साथसंगत केली, तर विघ्नेश जोशी यांनी खास शैलीत निवेदन करताना स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस यांच्यातील संवादाचे विविध प्रसंगांसह गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले.
मिळाली रसिकांची दाद
गायक धनंजय म्हसकर, श्रीरंग भावे, केतकी चैतन्य, केतकी भावे यांनी स्वरमयी गायन आविष्कार सादर केला. त्यांच्या गायनाने नाशिक करांची सायंकाळ भक्तिमय झाली. त्यांनी यावेळी माणिक वर्मा यांच्या गाण्यांसह लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी सादर करून रसिकांची दाद मिळविली.