भाजपात शह-काटशह

By admin | Published: March 8, 2017 01:17 AM2017-03-08T01:17:36+5:302017-03-08T01:18:14+5:30

नाशिक : महापालिकेत एकहाती स्पष्ट बहुमत प्राप्त केल्यानंतर भाजपात आता पक्षांतर्गत शह-काटशहचे राजकारण सुरू झाले असून, सत्तासंघर्ष टोकाला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Bhajpati Shah-Katshah | भाजपात शह-काटशह

भाजपात शह-काटशह

Next

नाशिक : महापालिकेत एकहाती स्पष्ट बहुमत प्राप्त केल्यानंतर भाजपात आता पक्षांतर्गत शह-काटशहचे राजकारण सुरू झाले असून, सत्तासंघर्ष टोकाला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निवडणुकीत पडद्याआडून विरोधी भूमिका घेणाऱ्यांना दुर्लक्षित करण्याबरोबरच दोन वर्षांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सत्तेत आपली मांड घट्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.  महापालिकेत भाजपाने ६६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. भाजपाने सोमवारी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी केल्यानंतर झालेल्या मेळाव्यात पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी आपल्या भाषणात जुन्या-नव्यांचा वाद न करता पक्षकार्यासाठी झटणाऱ्यांना पदे दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेत भाजपाच्या सत्ताकाळात पाच वर्षांत तब्बल ८८ पदे असल्याचे सांगत सर्वांनाच न्याय देण्याची भूमिकाही मेळाव्यात सांगण्यात आली आहे. मात्र, महापालिकेतील भाजपाच्या सत्तेची सूत्रे आता शहराध्यक्ष बाळासाहेब सानप आणि माजी महापौर वसंत गिते यांच्या हाती आल्याने सत्तापदांच्या वाटणीत डावे-उजवे होण्याची भीती काही नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे. त्याची सुरुवातच माजी महापौर वसंत गिते यांंच्या सुपुत्राची उपमहापौरपदी वर्णी लावल्याने झाल्याचे बोलले जात आहे. वसंत गिते यांच्या सुपुत्राला पहिल्याच वर्षी उपमहापौरासारखे पद दिल्याने भाजपाने घराणेशाहीला एकप्रकारे उत्तेजनच दिले असल्याची नाराजीही पक्षात व्यक्त होताना दिसून येत आहे. मात्र, उपमहापौरपदी प्रथमेश गिते यांची शिफारस करत शहराध्यक्ष सानप यांनी आमदार देवयानी फरांदे यांनाही शह दिल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत वसंत गिते यांचा पराभव केला होता. त्यानंतर गिते यांना भाजपात घेण्यासही त्यांनी प्रचंड विरोध केला होता. मात्र, पक्षाने गिते यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवत फरांदे यांच्यासह गिते विरोधकांना गप्प केले होते. आता गिते यांच्या सुपुत्रास थेट उपमहापौरपदाची बिदागी देत फरांदे यांच्यासह विरोधकांना शह दिला गेल्याची चर्चा आहे, तर गिते यांच्या सुपुत्राला पहिल्यांदाच सत्तापदाच्या बोहोल्यावर चढवत आमदार सानप यांनी पुढील महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांचे सुपुत्र मच्छिंद्र सानप यांचा मार्ग मोकळा केल्याचीही सुरस चर्चा रंगली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bhajpati Shah-Katshah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.