भाक्षी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये फूट
By admin | Published: September 10, 2014 10:37 PM2014-09-10T22:37:33+5:302014-09-11T00:30:14+5:30
भाक्षी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये फूट
सटाणा : बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीचे सरपंच शरद जाधव यांनी आवर्तनानुसार पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे इच्छुकांनी तिसऱ्या अपत्याचे हत्यार उपसले आहे. सदस्यांनी याप्रकरणी आयुक्तांकडे धाव घेतल्यामुळे सरपंचाचे धाबे दणाणले असून, सत्ताधाऱ्यामध्ये उभी फुट पडली आहे.
भाक्षी ग्रामपंचायतीची गेल्या वर्षभरापूर्वी पंचवार्षिक निवडणूक झाली. अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत निवडणुकीनंतर महेश सोनवणे, रोहिदास अहिरे, सीमा निकम, इंदुबाई रौंदळ, संजय गवळी शरद जाधव या सहा सदस्यांनी आपला स्वतंत्र गट केला. त्यानंतर सर्वानुमते दहा महिन्यांचे रोटेशन ठरवून सरपंचपदी शरद जाधव व उपसरपंच महेश सोनवणे यांची अविरोध निवड करण्यात आली होती. दरम्यान कालावधी संपल्यानंतर उपसरपंच महेश सोनवणे यांनी गटप्रमुखांकडे राजीनामा सादर केला आहे.
मात्र, जाधव यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे सत्ताधारी गटात मतभेद निर्माण होऊन शब्द न पाळणाऱ्या जाधवांविरुद्ध आता सर्वच सदस्य एकवटले आहेत. त्यांनी तिसऱ्या अपत्याचे हत्यार उपसून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी आयुक्तांकडे धाव घेतल्यामुळे सरपंचाचे धाबे दणाणले
आहे.