भालेकर विद्यालयाची दुरवस्था
By admin | Published: September 13, 2014 09:57 PM2014-09-13T21:57:14+5:302014-09-13T21:57:14+5:30
भालेकर विद्यालयाची दुरवस्था
नाशिक : जुने नाशिकसह परिसरातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, या हेतूने १९६८ साली स्थापन झालेल्या बी. डी. भालेकर विद्यालयाची अवस्था दयनीय झाली असून, शाळा क्रमांक २८ प्रमाणे या शाळेचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी परिसरातील पालकांनी केली आहे.
जुने नाशिक परिसरातील गरीब घरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी तत्कालीन नगरपालिकेच्या माध्यमातून या शाळेची १९६८ साली स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या शाळेत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. त्याकाळी शहरात जास्त विद्यालये नसल्याने आणि इंग्रजी माध्यमाचे पेव फुटले नसल्याने भालेकर विद्यालयात विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत होते.
नाशिक महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शिक्षण धोरणात बदल करण्यात आले. गणपतराव काठे हे शिक्षण मंडळावर असताना त्यांनी महापालिका शाळांना सातवीपर्यंत मान्यता देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागणी झाली. २००० सालानंतर परिसरात निर्माण झालेल्या शाळा, इंग्रजी माध्यमांचे फुटलेले पेव आणि खासगी शाळांना मिळालेली मान्यता यामुळे येथील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत २०१२-१३ या वर्षात सहावी ते दहावी या पाच इयत्तांसाठी ५८ विद्यार्थी शिल्लक राहिले.
५८ विद्यार्थ्यांसाठी अनुदान देणाऱ्या राज्य शासनाने विद्यार्थीसंख्येवर पटपडताळणी-दरम्यानच हरकत घेतली होती. अनुदान बंद होऊ नये यासाठी महापालिकेने येथील वर्ग आणि शिक्षक इतर शाळांमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाल्यानंतर ही शाळा पुन्हा सुरू झाली. आता या विद्यालयात सुमारे ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु या शाळेची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की विद्यार्थीसंख्या वाढणार कशी हा प्रश्न येथे येणाऱ्या पालकांना पडल्याशिवाय राहात नाही. शाळेचा उडालेला रंग, वर्गांची झालेली अवस्था, परिसरात झालेली अस्वच्छता, तुटलेली बाकडे आणि गळणारे छत अशी अवस्था पाहिल्यानंतर कोणता पालक या शाळेत आपल्या पाल्याला शिकवायला पाठवेल, हा प्रश्नच आहे. वर्गांमधील साचलेली धूळ पाहिली तर शाळेत कधी साफसफाई होते की नाही असा प्रश्न पडतो. त्यामुळे या जागेची सुधारणा करून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसवावे, अशी मागणी होत आहे. शाळेच्या परिसरात साचलेला कचरा पाहिला, तर शाळेची दैनंदिन स्वच्छता होते की नाही हा प्रश्न पडतो. या जागेची चांगली सुधारणा करून त्या ठिकाणी वर्ग सुरू झाल्यास पालकांचेही विचार बदलतील आणि त्या शाळेत विद्यार्थी येतील, असे बोलले जात आहे. नूतनीकरण नसले तरी किमान रंगरंगोटी तरी करावी, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. (प्रतिनिधी)