भाम धरणाला गळती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 06:05 PM2018-08-03T18:05:19+5:302018-08-03T18:06:35+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते गावाजवळ भाम नदीवर नव्यानेच बांधण्यात आलेल्या भाम धरणात यावर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊ लागल्याने पुनर्वसितात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पथकाने या गळतीची पाहणी करून गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथे भाम धरण बांधण्यात आले आहे. या धरणात यावर्षी पूर्णपणे पाणीसाठा करण्यात आल्याने हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र या धरणाच्या मुख्य सांडव्याच्या अंतर्भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने हे पाणी सिमेंटच्या सांडव्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात साचत असल्याने हे पाणी विजेच्या मोटारीने बाहेर काढण्यात येत आहे. दरम्यान या गळतीची माहिती स्थानिक नागरिकांनी घोटी पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ नये यासाठी कर्मचारी गणेश सोनवणे, रविराज जगताप आदींच्या पथकासह धरणाच्या गळतीची पाहणी केली .या गळतीमुळे भविष्यात धरणाच्या खाली पुनर्वसन केलेल्या नागरिकांना धोका निर्माण होणार नाही यासाठी गळती रोखा अशा सूचना केल्या आहेत.
इन्फो...
सांडव्याच्या पोकळीत साठते पाणी
पंतप्रधान सिंचन योजनेतून तयार झालेले लेडीज टीएमसी क्षमतेच्या या धरणात आरंभीच्या काळात धरणाची क्षमता पाहण्यासाठी निम्म्याहून कमी पाण्याचा साठा करणे गरजेचे होते.मात्र शासनाने पहिल्याच वर्षी पूर्णपणे साठा केल्याने धरणाला गळती होईल याची कल्पना प्रशासनाला आली नाही.परिणामी मुख्य सांडव्याच्या अंतर्भागात असलेल्या पोकळीत मोठ्या प्रमाणात गळतीमुळे पाणी साचत असल्याने हे पाणी नियमित काढले नाही तर हा सिमेंटचा कालवा पाण्याच्या दाबामुळे फुटून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान हे पाणी काढण्यासाठी दोन विजेचे पंप बसविले असून या पंपाद्वारे अखंडपणे पाणी बाहेर काढण्यात येत आहे.
पुनर्वसितात भीतीचे सावट
दरम्यान या धरणाच्या कामासाठी बुडीत क्षेत्रात गेलेल्या भरवज, निरपण या गावासह काळूस्ते गावाच्या दरेवाडी, सारु कतेवाडी, बोरवाडी या गावाचे पुनर्वसन धरणाच्या बांधाखाली केले आहे.भविष्यात ही गळती चालूच राहिली तर सर्वाधिक फटका या पुनर्वसित गावांना बसणार असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.