सेना-भाजप युतीच्या वर्चस्वामुळे भामरे यांना मिळाले मताधिक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:43 AM2019-05-24T00:43:48+5:302019-05-24T00:44:19+5:30
मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व कायम ठेवण्यात पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना मालेगाव बाह्य मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे.
मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व कायम ठेवण्यात पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना मालेगाव बाह्य मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचा करिष्मा व विरोधकांच्या दुबळेपणामुळे खासदार भामरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भुसे करीत आहेत.
भुसे यांच्याकडे खासदार भामरे यांच्या प्रचाराची सूत्रे होती, तर कॉँग्रेसकडे मविप्रचे अध्यक्ष व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळेवगळता एकही प्रभावी नेता नसल्याने याचा फटका कॉँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना बसला. मराठा समाजातील दोन्ही उमेदवार असतानादेखील खासदार भामरेंना मतदारांनी पसंती दिली. मालेगाव तालुक्यात सात जिल्हा परिषद सदस्यांपैकी पाच जिल्हा परिषद सदस्य भाजपचे व दोन शिवसेनेचे आहेत, तर १४ पंचायत समिती सदस्यांपैकी भाजप व सेना प्रत्येकी ६, राष्टÑवादी व अपक्ष प्रत्येकी १ असे संख्याबळ आहे. कॉँग्रेसचा एकही सदस्य जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य नाही. ग्रामीण भागात कॉँग्रेसचे संघटन नसल्याने याचा परिणाम प्रचार यंत्रणा व मतदानावर झाला. कुणाल पाटील हे मालेगाव बाह्य मतदारसंघासाठी नवखे उमेदवार होते, तर विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी तालुक्यात केलेली विकासकामे व ठेवलेला जनसंपर्क त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. शेवटच्या काही दिवसात भाजप-सेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करून जोमाने प्रचार केल्याने भामरे यांनी विजयश्री खेचून आणली.
या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणाम
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून, सलग तिसºयांदा धुळे मतदारसंघावर भाजपा-शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. माजी खासदार प्रतापदादा सोनवणेंनंतर डॉ. सुभाष भामरे सलग दुसºयांदा विजयी झाले आहेत. मालेगाव बाह्य मतदारसंघावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचा करिष्मा कायम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व आहे. विरोधक दुबळे असल्यामुळे बाह्य विधानसभा मतदारसंघात फारसा फेरबदल होण्याची चिन्हे दिसत नाही.