संमेलनाध्यक्षपदासाठी विदर्भाकडून भारत सासणे, नारळीकरांच्या अटी महामंडळ मान्य करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 04:58 AM2021-01-23T04:58:14+5:302021-01-23T04:58:26+5:30
नागपूर : नाशिक येथे नियोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचे नाव जाहीर होण्याच्या एक दिवस आधी ...
नागपूर :नाशिक येथे नियोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचे नाव जाहीर होण्याच्या एक दिवस आधी राजकारण, साहित्यकारण आणि अट-कारणाचा खेळ रंगला आहे. जयंत नारळीकर, भारत सासणे आणि जनार्दन वाघमारे यांच्यापैकी एक नाव निश्चित होणार आहे.
संमेलनस्थळ जाहीर होताच भारत सासणे यांचे अध्यक्षपदासाठीचे नाव अग्रक्रमाने चर्चेत आले होते. घुमान साहित्य संमेलनातील मानापमान नाट्यामुळे, महामंडळ अध्यक्षांची पसंती त्यांच्याच नावाला असल्याचेही बोलले जाते. विदर्भ साहित्य संघासाठीही विषय असल्याने घटकसंस्था म्हणून भारत सासणे यांचे नाव सुचविण्यात आले आहे.
स्वागताध्यक्ष म्हणून छगन भुजबळ यांच्याच नावाची चर्चा आहे. अध्यक्षपदासाठी जेव्हा निवडणुका घेतल्या जात होत्या तेव्हा विदर्भ साहित्य संघ ज्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करेल, तोच उमेदवार अध्यक्षपदी विराजमान होत असल्याचा इतिहास आहे. मात्र, जेव्हापासून निवडणुका बाद करण्यात आल्या, तेव्हापासून चित्र बदलले आहे. महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघ यांच्यात सासणे यांच्या नावावरून एकमत होत असल्याने सासणेच अध्यक्ष होतीत, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गेल्या संमेलनात परंपरा खंडित
गेल्या संमेलनात संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ऐनवेळी प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांनी व्हीलचेअरवर उपस्थित राहून संमेलनाचे उद्घाटन केले होते आणि नंतर उपचारासाठी मुंबईला गेले होते. प्रथमच संमेलनाध्यक्षांच्या अनुपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला होता. यंदा नारळीकरांनी सादर केलेली अट महामंडळाने मान्य केल्यास, इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. अशा स्थितीत अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.