भरतनाट्यम नृत्याविष्काराने जिंकली मने उत्सव नृत्यसाधनेचा : ‘जय गणेश’मधून प्राणिप्रेमाचा दिला संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:24 AM2018-02-07T01:24:43+5:302018-02-07T01:25:24+5:30
नाशिक : शक्तीस्वरूप देवीच्या आराधनेपासून तर जलबचतीचा संदेश देणाºया संकल्पनेवर आधारित सादर करण्यात आलेल्या विविध भरतनाट्यम नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली.
नाशिक : शक्तीस्वरूप देवीच्या आराधनेपासून तर जलबचतीचा संदेश देणाºया संकल्पनेवर आधारित सादर करण्यात आलेल्या विविध भरतनाट्यम नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली. निमित्त होते, नृत्यसाधना कला अकादमीच्या वतीने परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित ‘प्रगती उत्सव-२०१८’ या कार्यक्रमाचे. सृजनात्मक संकल्पनांची नृत्यप्रस्तुती यावेळी अकादमीच्या नृत्यांगनांनी सादर करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथून आलेल्या प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना कनकलता सुधाकर, उद्धव अहेर, विलास बिरारी, गंगाधर आमिन अकादमीच्या संचालक डॉ. संगीता पेठकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते नटराज पूजन करून मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी अकादमीच्या शिष्यांनी ‘पुष्पांजली’ संकल्पनेवर अधारित पदन्यास नृत्य सादर केले. त्यानंतर अकादमीमध्ये खास ‘नृत्ययोगसूत्र’ या भरतनाट्यम नृत्याद्वारे शारीरिक-मानसिक संतुलन प्राप्त करण्याचा प्रयत्न करणाºया नृत्यांगनांनी हा आगळावेगळा नृत्यप्रकार रसिकांपुढे तेवढ्याच ताकदीने सादर केला. योग, आसन, प्राणायाम, हस्तमुद्रा, संगीत थेरपीचा अनोखा संगम या नृत्यप्रकारातून उपस्थितांनी अनुभवला. या नृत्यप्रकारात वैशाली अहिरे, शिल्पा कोतकर, मंजूषा बोडके, रूपाली शेट्टी, विलासिनी शेट्टी यांनी सहभाग घेतला. तसेच कार्यक्रमाचा समारोप ‘नदी’ संकल्पनेवर आधारित भरतनाट्यम नृत्यरचनेने करण्यात आला.
‘वसुंधरेचा साज सांभाळा’
वसुंधरा अर्थात पृथ्वी ही सर्व सजीवसृष्टीची असून यावर मानवाइतकाच सर्वांचा हक्क अन् अधिकार आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या वसुंधरेचे संवर्धन काळाची गरज आहे. प्राणी, पक्षी या मुक्या जिवांच्या संरक्षणासाठी नागरिकांनी पुढे यावे, असा संदेश देणारी ‘जय गणेश’ ही नृत्यरचना कनकलात सुधाकर व त्यांच्या शिष्यांनी खास शैलीत सादर केली. नृत्याविष्कार रंगात आला असताना अचानकपणे काही तांत्रिक अडचण उद्भवल्याने कलावंतांचा काही वेळ हिरमोड झाला. पाच मिनिटांनंतर तांत्रिक अडचण दूर झाली आणि पुन्हा जेथून नृत्यरचनेत व्यत्यय आला तेथून पुढे नृत्याविष्कार नृत्यांगनांनी तितक्याच उत्साहात आणि ताकदीने सादर केला. यावेळी गजमुख हत्तीसह, गोमाता व सर्प अशा विविध जिवांच्या हावभाव कलावंतांनी नृत्यामधून रंगमंचावर मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. नृत्यसाधना अकादमीच्या वतीने अॅड. सदाशिवराव देवे पुरस्काराने पुण्याच्या ज्येष्ठ नृत्यांगना प्रमद्वरा किट्टूर यांचा गौरव करण्यात आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, दहा हजार रुपये रोख रक्कम प्रदान करण्यात आली.