भरधाव टेम्पोने दोघांना चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 11:55 PM2021-03-18T23:55:29+5:302021-03-19T01:37:02+5:30
पंचवटी : तपोवन परिसरातील साधुग्राममधील अंतर्गत रस्त्याने मुख्य रस्त्याकडे भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पोने रस्त्याच्या कडेला गप्पा करत उभ्या असलेल्या तिघांना चिरडले. यामध्ये एक अल्पवयीन मुलगा जागीच ठार झाला, तर दोघा दुचाकीस्वारांना त्यांच्या वाहनांसह फरपटत नेल्याने तेदेखील जबर जखमी झाले.
पंचवटी : तपोवन परिसरातील साधुग्राममधील अंतर्गत रस्त्याने मुख्य रस्त्याकडे भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पोने रस्त्याच्या कडेला गप्पा करत उभ्या असलेल्या तिघांना चिरडले. यामध्ये एक अल्पवयीन मुलगा जागीच ठार झाला, तर दोघा दुचाकीस्वारांना त्यांच्या वाहनांसह फरपटत नेल्याने तेदेखील जबर जखमी झाले. गुरुवारी (दि.१८) दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव ट्रक थांबता थांबत नव्हता. अखेर ट्रक एका पत्र्याच्या शेडमध्ये शिरला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तपोवन चव्हाण मळ्याकडून साधुग्राममधील अंतर्गत रस्त्याने दुपारच्या सुमारास आयशर टेम्पो (एमएच-१५ एफव्ही-७११२) भरधाव वेगाने जात असताना चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत अविचाराने वाहन दामटविले. यावेळी चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पो बेफामपणे चालत समोर रस्त्याच्या कडेला गप्पा मारत उभे असलेल्या तिघा मित्रांना येऊन धडकला. यावेळी दुचाकीवर बसलेल्या दोघांना त्यांच्या वाहनासह टेम्पोने फरपटत काही फुटांपर्यंत नेले. यावेळी त्यांच्यासोबत असलेला प्रथमेश जाधव (१६, रा. हनुमानवाडी) हा मृत्युमुखी पडला, तसेच संकल्प मुळे हा गंभीर जखमी झाला असून, त्यास परिसरातील नागरिकांनी उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले, तसेच हीरो होंडा (एमएच-१५ एचबी-६६६१) व होंडा शाइन (एमएच-१५ एचएल-१८९१) दुचाकींचा चुराडा झाला. तरीही आयशर टेम्पो थांबला नाही, तर रस्ता ओलांडून पुढे एका पत्र्याच्या शेडवर जाऊन आदळला. सुदैवाने पत्र्याच्या शेडमध्ये यावेळी कोणी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी आयशरचालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
तिसरा मित्र बालंबाल बचावला
प्रथमेश व संकल्प यांचा तिसरा मित्र मावशीला भेटण्यासाठी घरात गेला होता. यादरम्यान, टेम्पोने दोघांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात त्यांचा तिसरा मित्र बालंबाल बचावला. मावशीला भेटण्यासाठी जर मित्र गेला नसता, तर तोदेखील त्यांच्यासोबत गप्पा मारत उभा राहिला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघाताने साधुग्राम परिसरात राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांच्या जिवाचा थरकाप उडाला होता.
फोटो क्र : ८९/९१८९२