भरदुपारी बिबट्याची आली डरकाळी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:14 AM2021-07-25T04:14:25+5:302021-07-25T04:14:25+5:30

गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या दुगाव, मुंगसरा, दरी-मातोरी, मखमलाबाद या भागात बिबट्यांचे वास्तव्य असून, बिबटे येथील मळे परिसरात अधूनमधून ...

Bhardupari leopard was scared ...! | भरदुपारी बिबट्याची आली डरकाळी...!

भरदुपारी बिबट्याची आली डरकाळी...!

Next

गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या दुगाव, मुंगसरा, दरी-मातोरी, मखमलाबाद या भागात बिबट्यांचे वास्तव्य असून, बिबटे येथील मळे परिसरात अधूनमधून शेतकऱ्यांना दर्शन देत असतात. दरम्यान, मौजे वाडगाव शिवारातील कसबे मळ्याच्या परिसरात मागील तीन दिवसांपासून कमी वयाच्या बिबट्या नागरिकांच्या नजरेस पडत आहे. यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास या बिबट्याने तर चक्क येथील माणिक कसबे यांच्या मळ्यातील घराच्या शेजारी असलेल्या जनावरांच्या गोठ्याच्या छतावर बिबट्याने ठिय्या दिला. यावेळी बिबट्याच्या गुरगुरण्याच्या आवाजासह डरकाळी कानी पडल्याने रहिवाशांनी घराबाहेर येऊन बघितले असता छतावर बिबट्या बसलेला नागरिकांना नजरेस पडला. सुमारे पंधरा मिनिटे छतावर बिबट्याची बैठक होती. यावेळी बिबट्याला बघण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी गर्दी केली होती; मात्र बिबट्याने डरकाळी फोडताच सर्वांची पळापळ झाली अन् पाचावर धारण बसली. काही लोकांनी बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी त्याच्या दिशेने दगडही भिरकावले. घरांमध्ये लहान मुले असल्याने वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. याबाबत वनपरिमंडळ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली असून या ठिकाणी वनकर्मचारी भेट देऊन पाहणी करतील असे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.

--इन्फो--

दररोज कुत्र्यांची शिकार

वयात येणाऱ्या या बिबट्याकडून दररोज या भागातील कुत्र्यांची शिकार केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. दुगाव, मुंगसरा या भागातील आळंदी धरणाजवळच्या गावांमधील भटक्या कुत्र्यांची संख्या मागील काही दिवसांपासून बऱ्यापैकी कमी झाल्याचे येथील गावकरी सांगतात. वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

240721\24nsk_53_24072021_13.jpg

छतावर बसलेला बिबट्या

Web Title: Bhardupari leopard was scared ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.