कांद्याच्या प्रश्नावर विरोधक दुतोंडी - भारती पवार
By श्याम बागुल | Published: August 22, 2023 04:12 PM2023-08-22T16:12:46+5:302023-08-22T16:14:07+5:30
कांदा प्रश्नावरून जिल्ह्यातील बाजार समित्यांनी दुसऱ्या दिवशीही केंद्र सरकारच्या विरोधात बंद पुकारला आहे.
नाशिक : सध्या उपलब्ध असलेला व भविष्यात लागणाऱ्या कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे मिळावेत यासाठी कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्यात आल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करीत आराेग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा व टोमॅटोच्या भाववाढीच्या प्रश्नावरून संसदेत सरकार विरोधी भूमिका घेणारा विरोधी पक्ष दुतोंडी असल्याची टीका केली आहे.
कांदा प्रश्नावरून जिल्ह्यातील बाजार समित्यांनी दुसऱ्या दिवशीही केंद्र सरकारच्या विरोधात बंद पुकारला आहे. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.२२) डॉ. भारती पवार यांनी भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला आहे. निर्यात शुल्कात वाढ केली म्हणजे निर्यात बंदी केली असा नव्हे. या उलट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा म्हणून केंद्र सरकाने नाफेड मार्फत दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, हा कांदा २४१० रूपये क्विंटल दराने खरेदी करण्यात येणार आहे.
निर्यात मुल्य कमी असतांना देखील शेतकऱ्यांच्या कांद्याला इतका दर मिळालेला नाही. त्यामुळे यातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार असल्यामुळे याचा विचार शेतकऱ्यांनी करावा असे सांगून डॉ. पवार यांनी, टोमॅटोचे दरवाढ, कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा राहूल गांधी संसदेत उपस्थित करून सभात्याग करतात. आता मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला विक्रमी भाव मिळणार असतांनाही पुन्हा आंदोलनाची भाषा करीत असून हा त्यांचा दुटप्पीपणा असल्याची टीकाही केली आहे.