नातू,पणतू सांभाळत भास्कर बनकर सरपंचपदही सांभाळणार; आमदार बनकर यांना धक्का, पुतण्या तिसऱ्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 04:42 PM2022-12-20T16:42:26+5:302022-12-20T16:43:44+5:30
पिंपळगाव बसवंत हे शहर जिल्ह्याच्या आर्थिक सक्षमीकरणात हातभार लावणारे शहर म्हणून ओळखले जाते. निफाडचे आमदार दिलीप बनकर यांचे पिंपळगाव होमग्राउंड आहे.
सुदर्शन सारडा -
ओझर : नाशिक जिल्ह्यातील सर्वता मोठ्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतमध्ये विश्रांतीनंतर सत्तांतर झाले. शिवसेना ठाकरे गटाचे भास्करराव बनकर सरपंचपदी विजयी झाले. भाजपचे सतीश मोरे हे आठ हजार मते घेऊन दुसऱ्या स्थानी राहिले तर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांचे पुतणे गणेश बनकर यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
पिंपळगाव बसवंत हे शहर जिल्ह्याच्या आर्थिक सक्षमीकरणात हातभार लावणारे शहर म्हणून ओळखले जाते. निफाडचे आमदार दिलीप बनकर यांचे पिंपळगाव होमग्राउंड आहे. मागील ग्रामपंचायत निवडणूकीत सत्तेसह त्यांच्या वहिनी सरपंचपदी निवडून आल्या तर वैशाली भास्कर बनकर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या आमदारकीत दिलीप बनकर विजयी झाले. परंतु गत पाच वर्षांत अनेक घडामोडी घडत गेल्या. ग्रामविकासाच्या येथेच्छ अनुभव असेलल्या भास्करराव बनकर कमालीचा संयम दाखवून आपली फळी उभारत गेले.
अशातच आमदारकी,बाजार समिती, सोसायटी, ग्रामपंचायत अशी सत्ताकेंद्र ताब्यात आल्यावर लोकांनी वेळोवेळी सांगूनही बनकर यांनी आपल्या काही साथसंगती वर आपला विश्वास कायम ठेवला. मागची निवडणूक ज्या ग्रामविकास अधिकाऱ्यां भोवती फिरली ते कायम ठेवले गेले. नेहेमी मी म्हणेल तीच पूर्वदिशा हा स्थायीभाव,अल्पेश पारख यांना न दिलेले उपसरपंचपद,सतीश मोरे यांचे तिसरे संघर्ष पॅनल, पिंपळगावचा वादग्रस्त मुख्य काँक्रिट रस्ता आदी बाबी गणेश बनकर यांच्या पराभवात भर घालणाऱ्या ठरून गेल्या.
मुळात मागील निवडणुकीत उमेदवार म्हणून सतीश मोरे यांचा निसटता पराभव झाला तोच कित्ता यावेळीही सरपंचपदासाठी त्यांच्यासाठी दिसून आला.मागील वेळी मिळालेल्या साडेसात हजार मतांपुढे अभ्यासा करून आपल्या गटाची मोट बांधण्यात भास्कर बनकर यशस्वी झाले तर लोकांची प्रचंड सहानुभूती भास्कर बनकर यांना मिळत गेली. ह्या वयात भास्कररावांनी दिलेली लढत ही कमालीची होतीच. मुळात मागच्या निवडणुकीत वैशाली भास्कर बनकर यांना पडलेली साडेसात हजार मते तशीच राहिली. विरोधकांकडून उतार वयात नातू पणतू सांभाळण्याचे केलेले आवाहन पिंपळगाववात सुपरहिट ठरले पण मतदारांनी त्यांना गावही सांभाळायला दिल्याने भविष्यात होणाऱ्या बाजार समिती,आमदारकीसाठी दिलीप बनकर मोठे यांना आव्हान उभे करून गेले आहे.