नामपूरला भवानी माता यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 08:57 PM2021-02-22T20:57:00+5:302021-02-23T23:51:07+5:30
नामपूर : उत्तर महाराष्ट्र तसेच मोसम खोऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या आई भवानी मातेचा यात्रोत्सव कोरोनामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेशही काढण्यात आले असल्याची माहिती प्रशासक भैयासाहेब सावंत, ग्रामविकास अधिकारी केशवराव इंगळे यांनी दिली.
शहरात मोसम नदीच्या काठावर प्राचीन ग्रामदैवत आई भवानी मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. याठिकाणी अनेक वर्षांपासून यात्रोत्सव होतो. या यात्रेसाठी गुजरात, धुळे, नंदुरबार, जळगाव, उत्तर महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात. यावर्षी माघी पौर्णिमेपासून भवानी मातेची यात्रा भरणार होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्रामपंचायत प्रशासनाने ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यावसायिक, भाविकांनी यात्रा उत्सवासाठी कोणतीही दुकाने, मनोरंजनात्मक पाळणे आदी न लावण्याचे आवाहन केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. यात्रोत्सव रद्द झाल्याने लाखोंची उलाढाल ठप्प होणार आहे.