भावजयीचा फरार मारेकरी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 04:34 PM2020-06-04T16:34:58+5:302020-06-04T16:38:38+5:30
हनुमानवाडीतील मोरेमळा येथे मंगळवारी (दि.२) रात्री संशयित अनिल पाटील याने भावजयी ज्योती सुनील पाटील हिचा खून केला होता, तर मध्यस्थी करणाऱ्या भाऊ सुनीलवर देखील चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : घरात नुसता बसून राहतो, कामधंदा करत नाही, काम करत जा असे सांगितल्याचा राग अनावर झाल्याने हातातील धारधार चाकूने भावजयीच्या छातीवर वार करून तिचा खून करत सख्ख्या भावावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणात दोन दिवसांपासून फरार असलेल्या अनिल पांडुरंग पाटील याला पंचवटी पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाने सिडकोतील एका देशी दारू दुकानातून ताब्यात घेतले आहे.
पंचवटीतील हनुमानवाडीतील मोरेमळा येथे मंगळवारी (दि.२) रात्री संशयित अनिल पाटील याने भावजयी ज्योती सुनील पाटील हिचा खून केला होता, तर मध्यस्थी करणाऱ्या भाऊ सुनीलवर देखील चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. संशयित आरोपी व त्याचा भाऊ, आई आणि भावजयी असे रामनगर येथे राहत असून, संशयित अनिल हा काही कामधंदा करत नव्हता, त्याला दारूचे व्यसन होते. त्यातून वाद होऊन त्याने भावजयीचा खून केला. संशयित अनिल पाटील हा सिडकोत फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना मिळाली त्यानुसार गुन्हा शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, हवालदार संजय वानखेडे, सुरेश नरवाडे, संदीप शेळके, महेश साळुंके, विष्णू जाधव आदींनी सिडकोत त्याचा शोध सुरू केला असता संशयित एका देशीदारूच्या दुकानात मद्यपान करत असल्याचे दिसून येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संशयित अनिल याला काही वर्षांपूर्वी पंचवटी पोलिसांनी बॅटरी चोरी प्रकरणात अटक केली होती.