भावली धरण ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 11:40 PM2020-08-05T23:40:32+5:302020-08-06T01:40:12+5:30
घोटी : इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेरघर म्हणून समजला जात असतानाही यावर्षी या तालुक्याकडे वरूणराजाने काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या एका दिवसाच्या पावसाने इगतपुरी तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या वातावरणामुळे तालुक्यात रात्रभर धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे काही प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इगतपुरीची जीवनवाहिनी समजली जाणारे भावली धरण अखेर ओसंडून वाहून ओव्हरफ्लो झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेरघर म्हणून समजला जात असतानाही यावर्षी या तालुक्याकडे वरूणराजाने काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या एका दिवसाच्या पावसाने इगतपुरी तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबईच्या वातावरणामुळे तालुक्यात रात्रभर धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे काही प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इगतपुरीची जीवनवाहिनी समजली जाणारे भावली धरण अखेर ओसंडून वाहून ओव्हरफ्लो झाले आहे.
भावली धरण भरले म्हणजे इगतपुरी तालुक्याची बहुतांश चिंता दूर होते. भावली हे धरण दरवर्षी सर्वप्रथम म्हणजेच जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने भरते. यावर्षी मात्र जून व जुलै हे दोन्ही महिने कोरडेठाक गेल्याने पाऊस नाही, त्यामुळे धरणातील जलसाठा जेमतेम शिल्लक होता. भावली धरण भरण्याकडे सर्वच नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र घाटमाथ्यावरील पावसामुळे भावली धरणातील जलसाठ्यात वाढ होत दोन दिवसांपासून भावली धरण ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा होती. अखेर आज पहाटेच्या सुमारास भावली धरण भरल्याची शुभवार्ता तालुक्याच्या कानी आली आणि तालुक्याची काहीशी चिंता दूर झाली.
भावली धरण भरल्यानंतरच तालुक्यातील इतर धरणे भरण्यास सुरुवात होते अशी स्थिती आहे. त्यामुळे आता आगामी काळात समाधानकारक पाऊस झाला, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला तर भाम, दारणा, कडवा, मुकणे, वैतरणा, वाकी आदी धरणेही भरली जातील. मात्र यावर्षी सुरुवातीचे दोन्ही महिने कोरडेच गेल्याचे सर्वच घटकात चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी जर उर्वरित धरणे भरली नाहीत तर तालुक्याला भयानक संकटाला सामोरे जावे लागेल यात शंकाच नाही. चोवीस तासात १०९ मिमी पावसाची नोंद मुंबई ठाण्यात मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस असल्याने रात्रीपासून इगतपुरी तालुक्यातही धुवाधार पाऊस झाला; मात्र रात्रभर पाऊस झाला असला तरी आज सकाळपासून पुन्हा पावसाने दडी मारल्याने पावसाचा हा आनंद औटघटकेचा ठरतो की काय अशी चिंता तालुक्यातील नागरिकांना वाटू लागली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अर्थात चोवीस तासात १०९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. जवळपास १५०० दलघफू क्षमतेचे भावली धरण जुलैअखेरीस ओसांडून वाहते. मात्र यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्याने हे धरण जवळपास १५ दिवस उशिराने भरले.