नाशिकमध्ये भुजबळ फार्मच्या गेटवर भाजयुमोचे सरस्वती पुजन आणि आरती, त्या विधानाचा अभिनव निषेध
By संजय पाठक | Published: September 28, 2022 03:36 PM2022-09-28T15:36:36+5:302022-09-28T15:37:27+5:30
Chhagan Bhujbal : नाशिक येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नाशिक येथील भुजबळ फार्म येथे सरस्वती पूजन करून भुजबळ यांचा निषेध करण्यात आला
- संजय पाठक
नाशिक- राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नवरात्रीच्या सुरुवातीला जाहीर कार्यक्रमात शाळेमध्ये सरस्वती व शारदा मातेचे पुजन कशासाठी अशा प्रकारचे विधान केल्याने आज नाशिक येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नाशिक येथील भुजबळ फार्म येथे सरस्वती पूजन करून भुजबळ यांचा निषेध करण्यात आला.
आज सकाळी भाजयुमोचे पदाधिकारी माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून त्यांना सरस्वती मातेची प्रतिमा भेट देण्यासाठी पदाधिकारी भुजबळ फार्म येथे गेले होते. मात्र भुजबळ उपस्थित नसल्यामुळे फार्म हाऊसवर सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज हे महापुरुष महाराष्ट्राचे दैवतच आहे त्यांचे रोज स्मरण झालेच पाहिजे त्याच बरोबर विद्येची देवता सरस्वती व शारदा माता यांची पण आराधना झाली पाहिजे. अशी भुमिका घेत भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी यांनी नमुद केली. तसेच सावित्रीबाई फुले यांनी सरस्वती विषयी काय भावना व्यक्त केल्या त्याची माहिती काव्य फुले या काव्य संग्रहात असून ते पुस्तक भुजबळ यांना भेट देण्यात येणार असल्याचे यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घुगे यांनी सांगितले.
यावेळी चंद्रशेखर पंचाक्षरी, विजय बनछोडे, राहुल कुलकर्णी, ऋषिकेश आहेर, धनंजय पुजारी, डॉ.वैभव महाले, संदिप शिरोळे, साक्षी दिंडोरकर, प्रविण भाटे, प्रशांत वाघ, विनोद येवले, भाविक तोरवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.