भिडे गुरुजी यांना न्यायालय पुन्हा धाडणार समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:26 AM2018-09-29T01:26:55+5:302018-09-29T01:27:41+5:30
नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे न्यायालयात गैरहजर राहत असल्याने त्यांना दुसऱ्यांदा समन्स काढण्याचे आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांनी शुक्रवारी (दि़ २८) दिले़ या समन्सनुसार येत्या १२ आॅक्टोबरला भिडे यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे़
नाशिक : नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे न्यायालयात गैरहजर राहत असल्याने त्यांना दुसऱ्यांदा समन्स काढण्याचे आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांनी शुक्रवारी (दि़ २८) दिले़ या समन्सनुसार येत्या १२ आॅक्टोबरला भिडे यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे़ भिडे गुरुजी यांच्याविरोधात नाशिक महापालिकेने खटला दाखल केला असून, त्यावरील सुनावणीत हे आदेश देण्यात आले़ न्यायाधीश पांडे हे रजेवर असल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकजा धांडे यांच्या न्यायालयात सुनावणी होती़ मात्र, भिडे आजही न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात समन्स काढण्याचे आदेश धांडे यांनी आदेश देत २८ सप्टेंबर ही तारीख ठेवली होती़ मात्र, न्यायालयाचे समन्स भिडे गुरुजींपर्यंत पोहोचले नसल्याचे न्यायालयास स्पष्ट झाले. त्यामुळे येत्या १२ आॅक्टोबरला न्यायालयासमोर हजर राहण्याचे दुसºयांदा समन्स काढण्यात आले आहे़
१० जून रोजी नाशिकमधील सभेत आंबे खाल्ल्याने मुलं होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले होते़ या वक्तव्याबाबत ‘लेक लाडकी अभियान’तर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकाकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत, नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागास सदरील वक्तव्याची खातरजमा करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त संचालकांनी दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने त्यासंदर्भात भिडे गुरुजी यांना नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्याचे सांगण्यात आले. परंतु भिडे गुरुजींकडून नोटीस स्वीकारण्यात आली नाही, वा चौकशीलाही ते उपस्थित न राहिल्याने महापालिकेने यासंदर्भातील अहवालासह नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला़
भिडे दोन्ही तारखांना अनुपस्थित
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू असून, ७ आॅगस्ट रोजी प्रथम सुनावणीसाठी ठेवले होते़ यानंतर १० आॅगस्ट, २४ आॅगस्ट या दोन्ही तारखांना भिडे न्यायालयात हजर राहिले नाहीत़ भिडे यांनी न्यायालयात हजर राहावे यासाठी ३१ आॅगस्ट ही तारीख ठेवण्यात आली होती़