अपप्रचारामुळे भिडे गुरुजींची मालेगावची सभा झाली रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 10:41 PM2022-01-03T22:41:45+5:302022-01-03T22:43:09+5:30
मालेगाव : शहरातील सोयगावात रविवारी (दि. २) रात्री श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची नियोजित सभा रद्द ...
मालेगाव : शहरातील सोयगावात रविवारी (दि. २) रात्री श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची नियोजित सभा रद्द होऊन गुरुजींना बंदिस्त खासगी जागेत बैठक घ्यावी लागली. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्याबद्दल अपप्रचार केला जात असल्यामुळे सभा रद्द करावी लागली. तरीही राष्ट्र विरोधी समाजाविरोधात आपण लढत राहू, असे भिडे गुरुजी यांनी सांगितले. दरम्यान, भिडे यांच्या या बैठकीची दिवसभर शहरात चर्चा सुरू होती.
मालेगावात श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांना जाहीर सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारलेली असताना आणि दिवसभर शहरातील भिडे यांचे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगण्यात येत असताना रविवारी (दि. २) रात्री उशिराने अचानक शहरातील सोयगावात संभाजी भिडे प्रकटले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनंतर रात्री उशिरा बैठकही घेतली. पोलिसांची परवानगी नसताना संभाजी भिडे यांनी शहरात दिलेल्या भेटीची दिवसभर शहरात एकच चर्चा होती. संबंधित कार्यकर्त्यांकडे विचारणा केली असता कुणीही याबाबत बोलायला तयार नव्हते. संभाजी भिडे यांनी रात्री उशिरा सोयगावात तरुणांची बैठक घेतल्याचे समजते. यावेळी भिडे यांनी गेल्या काही दिवसांपासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कामाबद्दल अपप्रचार केला जात असल्यामुळे आजची सभा रद्द करावी लागल्याची खंत व्यक्त केली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्य हे ३६५ दिवस शिवकार्य करत राहणे एवढेच असल्याचेही भिडे गुरुजी यांनी सांगितले. दरम्यान, बैठकीत उपस्थित असलेल्या तरुणांनी मात्र आपली नावे देण्यास नकार दिला.
चोपड्यात गुन्हा दाखल
संभाजी भिडे यांनी मालेगावी येण्यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे जाहीर सभा घेतल्याबद्दल पोलिसांनी भिडे गुरुजींसह ३०० ते ४०० जणांवर गुन्हा दाखल केला. त्यामुळे मालेगावच्या सभेकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. परंतु, भिडे यांनी रात्री उशिरा येऊन एका बंदिस्त खोलीत ३० ते ४० जणांच्या उपस्थितीत बैठक घेतल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमीच आहे.