नाशकात राष्ट्रवादीचे खड्डे दुरूस्तीसाठी ‘भिक मांगो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 03:12 PM2018-08-01T15:12:18+5:302018-08-01T15:15:22+5:30
बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना बसस्थानकात उभे राहणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रवाशांची होत असलेली गैरसोय बघता
नाशिक: शहरातील महत्वाच्या निमाणी बसस्थानकाला अनेक समस्यांनी ग्रासले असून येथील दुरावस्थेबाबत आगारप्रमुखाना वारंवार तक्रारी व निवेदन देऊन देखील दुरुस्ती होत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी निमाणी बसस्थानकात उपस्थित प्रवाश्यांकडे ‘भिक मांगो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवाशांनी बस प्रशासनाला भिक देत आंदोलनास पाठींबा दर्शविला.
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या निधीतून पंचवटी निमाणी येथील बसस्थानकाचे अत्याधुनिक पद्धतीने पाच वर्षापुर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. त्यातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आता बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना बसस्थानकात उभे राहणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रवाशांची होत असलेली गैरसोय बघता आगरप्रमुखांना वेळोवेळी समस्यांबाबत निवेदन देण्यात आले होते. वारंवार तक्रारी करून देखील एस. टी. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी सकाळी बसस्थानकात भिक मांगो आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदवून जमा झालेली रक्कम आगारप्रमुखाना दिली. प्रशासनाने दखल घेऊन निमाणी बस स्थानकाची लवकर दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी कार्याध्यक्ष अॅड. चिन्मय गाढे, प्रफुल पाटील, किरण पानकर, नवराज रामराजे, किरण मानके, डॉ.संदीप चव्हाण, सुनील घुगे, स्वप्नील चव्हाण, भूषण गायकवाड, विशाल डोखे, नदीम शेख, रितेश जाधव, रोहित जाधव, राज रंधवा, राम शिंदे आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.