अंधांसाठी वामनदादांच्या गीतांची ‘भीमज्योत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:21 AM2018-08-15T01:21:30+5:302018-08-15T01:21:54+5:30
लोककवी वामनदादा कर्डक यांची गीते शहरापासून गाव खेड्यांपर्यंत आजही गायिली जातात. आंबेडकरी चळवळीपासून सुरू झालेली दादांची गीते आजच्या परिस्थितीतही तितकीच समर्पक असल्याने त्यांच्या गीतांचा गोडवा कायम आहे.
नाशिक : लोककवी वामनदादा कर्डक यांची गीते शहरापासून गाव खेड्यांपर्यंत आजही गायिली जातात. आंबेडकरी चळवळीपासून सुरू झालेली दादांची गीते आजच्या परिस्थितीतही तितकीच समर्पक असल्याने त्यांच्या गीतांचा गोडवा कायम आहे. सर्वसामान्यांना आपल्या आयुष्याचे गाणे वाटणाऱ्या दादांची गीते अंध बांधवांनादेखील तितकीच जवळची असल्याने अंध बांधव दादांची गीते सर्वाधिक सादर करीत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. हीच बाब ओळखून प्राध्यापक शरद शेजवळ यांनी ‘भीमज्योत’ या काव्यसंग्रहातून अंधांना दादांच्या गीतांची नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. वामनदादा यांच्या गीतांचा हा संग्रह त्यांनी ब्रेललिपीत तयार केला असून, अशाप्रकारचा हा पहिलाच ब्रेललिपी गीतसंग्रह मानला जात आहे. आंबेडकरी चळवळीत लोककवी वामनदादा कर्डक यांच्या शाहिरी जलशातून मोठी लोकचळवळ उभी राहिली आणि आंबेडकरी चळवळीला धार मिळाली. वामनदादांच्या स्फूर्तीगीतांनी पेटलेल्या समाजात चेतना निर्माण झाली. तळागाळातील माणसं वामनदादांची गीते गुणगुणू लागली. दादांच्या गीतांची ही जादू आजही कायम आहे. अंध बांधव वामनदादांची गाणी ऐकून ती सर्वाधिक म्हणतात. याच बांधवांसाठी ब्रेललिपीत वामनदादांचा गीतसंग्रह तयार करण्यात आला आहे. महात्मा फुले, आंबेडकरी जलशांची समृद्ध परंपरा ही आंबेडकरी गीत रचनांना असून, वामनदादा कर्डक यांची अनेक अलिखित-अप्रकाशित गाणी आजही गाव-खेडे, पाडे, वाडी-वस्ती, तांडा, गावकुसाबाहेर- ओवी, जात्यावर आणि मोर्चे, आंदोलने यात प्रबोधन- परिवर्तन क्र ांतिगीते व स्फुर्तीगीते म्हणून गायिली जातात. ४३ गीतांचा संग्रह आता अंधजनांना ब्रेललिपीत उपलब्ध झाला आहे. सन २०१३ला वामनदादा कर्डक यांच्या उपस्थितीत वामनदादा प्रतिष्ठानची घोषणा झाली आणि नाशिक शहरातील रुंग्ठा विद्यालयातील रात्र शाळा व उत्तर महाराष्ट्रातील अंध-अपंग विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन वामनदादांनी सन्मानित केले. एका अंध मुलाचा सत्कार करताना त्यांचे डोळे पाणावले दादा भावुक झाले. त्या अंध मुलाने दादांचे गीत सादर कले. त्याचवेळी प्रतिष्ठानने दादांची गीते ब्रेललिपीत अंधांसाठी उपलब्ध करून देण्याची शपथ घेण्यात आली. त्याची पूर्तता शेजवळ यांच्या प्रयत्नाने झाली आहे.
समाज प्रबोधनाचा ४३ गीतांचा संग्रह
‘भीमज्योत’ नावाने ब्रेललिपीतून दादांच्या ४३ गीतांचा हा संग्रह लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष प्राध्यापक शरद शेजवळ यांनी संपादित केला आहे, तर विकास शेजवळ व रामदास जगताप (दि ब्लार्इंड वेलफेअर असोसिएशन इंडिया नाशिक) यांनी मुद्रण केले आहे. दीक्षा प्रशील प्रकाशन नाशिकने तो प्रकाशित केला आहे. एकूण ४३ गीतांचा सामाजिक प्रबोधन गीतांचा हा संग्रह भारतातील पहिला आंबेडकरी (ब्रेललिपीतील) गीतसंग्रह ठरला आहे.