भोजापूर’चा गाळ उपसण्याची आवश्यकता

By admin | Published: May 19, 2017 12:46 AM2017-05-19T00:46:03+5:302017-05-19T00:54:28+5:30

साठवण क्षमतेत घट : शासनासह सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज‘

Bhojapur's sludge needs to be pumped | भोजापूर’चा गाळ उपसण्याची आवश्यकता

भोजापूर’चा गाळ उपसण्याची आवश्यकता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरशिंगोटे : तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या भोजापूर धरणात प्रचंड गाळ साचला असल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. धरणाच्या निर्मितीपासून एकदाही गाळ उपसण्यासाठी प्रयत्न झाला नसल्याने पाण्यापेक्षा गाळ अधिक अशी स्थिती आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी भोजापूरमधील गाळ उपसण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
या धरणातील गाळ काढल्यास पाण्याची साठवण क्षमता वाढून धरणाच्या सिंचन लाभक्षेत्रातील शेती ओलिताखाली येऊ शकेल. मात्र त्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. नाशिक-पुणे महामार्गापासून १३ किलोमीटर अंतरावर व अकोले तालुक्यातल्या पाचपट्टा परिसरात उगम पावणाऱ्या म्हाळुंगी नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. ३६५ दशलक्ष घनफूट क्षमतेचे मातीचे धरण सन १९७२ च्या दुष्काळात पूर्ण झाले. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, पाटबंधारेमंत्री शंकरराव चव्हाण व आमदार रुक्मिणीबाई वाजे यांच्या उपस्थितीत धरणाचे भूमिपूजन झाले होते. भोजापूर धरणाची लांबी ४८० मीटर असून, नदीपासून उंची ३८ मीटर आहे. डावा तट कालवा अंदाजे १८ किलोमीटरच्या आसपास आहे. धरणाचा १२१ दशलक्ष घनफूट निरुपयोगी पाणीसाठा आहे. या धरणावर रब्बी व खरीप हंगामात सुमारे ४००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तसेच भोजापूर धरणावर सिन्नर तालुक्यातील मनेगावसह १७ गावे व कणकोरीसह पाच गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना आहे, तर संगमनेर तालुक्यातील गावांसाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. हजारो लोकांची तहान भागविणाऱ्या व हजारो एकर शेतीला पाणी पुरवणाऱ्या धरणामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. तसेच उन्हाळ्यातील उपाययोजना म्हणून परिसरातील पाझर तलाव, बंधारे याच धरणाच्या पाण्याने भरले जातात. पावसाळ्याच्या दिवसात दोन-दोन महिने पूरपाणी सुरू असते. तसेच यातून उपसा जलसिंचन योजनेला पाणी दिले जाते.
भोजापूर धरणाचे पात्र मोठे असल्याने पाण्याचा परिसर मोठा आहे. परिसराला वरदान ठरलेल्या धरणातील गाळ काढला गेलेला नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असते. गाळ साचल्यामुळे धरणाची जेवढी क्षमता आहे तेवढेही पाणी राहत नाही. धरण परिसरात जागोजागी मातीचे ढिगारे उभे राहिले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होते. गाळ साचल्यामुळे पाण्याला वेगळाच दर्प येतो. धरणातील गाळ काढला गेल्यास पाण्याची क्षमता वाढून मोठ्या प्रमाणात साठा होऊ शकतो.
पूर्वी रब्बी हंगामात दोन आवर्तनांमध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने व गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी झाली असून, शेतकऱ्यांना यातून कसेबसे एकच आवर्तन मिळत आहे. तेही लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
भोजापूर धरण नांदूरशिंगोटे व तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरले आहे. धरणाच्या पाण्यावरच परिसरातील शेती अवलंबून आहे. परंतु गेल्या पाच वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे या भागातील शेती व्यवसाय संकटात सापडला आहे.

Web Title: Bhojapur's sludge needs to be pumped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.