पैशांचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूगिरीला फुटले पेव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:50+5:302021-08-24T04:18:50+5:30
शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सार्वजनिक शौचालयाच्या वरच्या बाजूस बांधलेल्या सुरक्षारक्षकाच्या खोलीचा ताबा घेत पैशांचा पाऊस पाडण्याचे लोकांना ...
शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सार्वजनिक शौचालयाच्या वरच्या बाजूस बांधलेल्या सुरक्षारक्षकाच्या खोलीचा ताबा घेत पैशांचा पाऊस पाडण्याचे लोकांना आमीष दाखवत दुकान चालविणाऱ्या भोंदुबाबाचा पर्दाफाश झाला; मात्र हा भोंदूबाबा पोलिसांना गुंगारा देत शहरातून पोबारा करण्यास यशस्वी ठरला असून दोन महिने उलटूनदेखील तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
पोलिसांनी गंगापुर गावात अशाचप्रकारे एका भोंदूबाबासह त्याच्या दोघा साथीदारांना बेड्या ठोकल्या. या भोंदूबाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमीष दाखवत एका पिडित महिलेचा शारिरिक छळ करत नग्नावस्थेत पुजेत सामील होण्यासाठी भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. भोंदूबाबा संशयित कामील गुलाम यासीन शेख (२९, मूळ रा. उत्तरप्रदेश) याच्यासह संशयित स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस (५८, रा. मूळ आंध्रप्रदेश), अशोक नामदेव भुजबळ (६३, रा. सातपूर) या दोघा संशयितांनाही अटक केली. त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मागील महिन्यात मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथून ग्रामीण पोलिसांनी चमत्कार दाखविणाऱ्या एका बुवाबाजी करणाऱ्या भगताला बेड्या ठोकल्या होत्या. जानेवारी महिन्यात चक्क जुन्या नाशकातील बाजारपेठेतील काही दुकानांपुढे जादुटोण्याचे आघोरी कृत्य करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.
--इन्फो--
...अन् म्हणे जमिनीतून सोने काढून देतो
जमिनीतून सोने काढून देण्याचे आमीष दाखवत लाखोंना गंडा घालणाऱ्या पाथर्डीफाटा येथील एका भोंदूबाबाचा पर्दाफाश मागील वर्षी डिसेंबर महिन्यात गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने मुंबईतून बेड्या ठोकल्या होत्या. या भोंदू बडेबाबाने स्वत:च्या नावापुढे तर चक्क ‘श्री.श्री महामंडलेश्वर१००८’ अशी उपाधी लावून घेत स्वयंघोषित ‘महंत गणेशानंदगिरी’ असे म्हणवून घेतले होते.
---इन्फो---
भोंदुगिरी करणाऱ्यांचे शहरात एजंट
भोंदुगिरी करणाऱ्या बाबा मंडळींनी शहरातील वेगवेगळ्या भागात एजंट नेमले असून हे लोक पिडित समस्याग्रस्तांचा शोध घेत बाबांच्या दरबारात भोळ्याभाबड्यांना घेऊन जाण्याचे काम पार पाडत आहेत. पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अशा एजंटांच्याही मुसक्या बांधल्यास भोंदूगिरीची पाळेमुळे धार्मिक पौराणिक शहर असलेल्या नाशकातून उखडून फेकण्यास यश येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
---कोट---
भोंदूगिरी शहरात सर्रास वाढत आहे. भोंदूबाबांची संख्या शहर व परिसरात चोरीछुप्या पध्दतीने वाढू लागली आहे. जादुटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे सरकारकडून केली जावी. २०१३साली कायदा पारित केला गेला; मात्र नियमावलीच तयार होऊ शकलेली नाही, हे दुर्दैवच. तक्रारदार पुढे येत नाही यामुळे प्रकरणे दडपली जातात, याबाबत आमची संघटना सातत्याने प्रबोधनावर भर देत आहे. भोंदुबाबांना गंभीर शिक्षा घडल्याचे अद्याप एकही उदाहरण नाही. न्यायालयीन काेठडीनंतर त्यास सहजच जामीन मिळतो.
- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस
--कोट--
नागरिकांनी समस्यांवर शॉर्टकट उपाय शोधत अंधश्रध्देचे बळी पडू नये. पैशांचा पाऊस, जमिनीतुन सोने काढून देणे अशा सर्व काही भुलथापा असतात वस्तुस्थितीमध्ये केवळ हे भोंदुगिरी करणारे लोक आर्थिक लुबाडणुक करतात तर कधी-कधी महिलांचा शारिरिक छळ करण्यापर्यंतही यांची मजल जाते. त्यामुळे अशा लोकांपासून वेळीच सावध होत शहर पोलीस नियंत्रण कक्षाला आपल्या आजुबाजुला असा प्रकार घडत असेल तर माहिती कळवावी, पोलिसांकडून तातडीने कारवाई केली जाईल.
- अंचल मुदगल, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, गंगापुर पोलीस ठाणे
230821\23nsk_23_23082021_13.jpg~230821\23nsk_24_23082021_13.jpg~230821\23nsk_25_23082021_13.jpg
भोंदूबाबाने पैशांचा पाऊस~भोंदूबाबाने पैशांचा पाऊस~भोंदूबाबाने पैशांचा पाऊस