भूतानच्या जवानाने ‘कॅट्स’मध्ये गिरविले धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:30 AM2018-11-11T01:30:28+5:302018-11-11T01:30:49+5:30
भारत-भूतान या दोन देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधामुळे भूतानच्या सैन्यदलातील काही जवानांना भारतात सैनिकी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. मागील वर्षभरापासून भूतानचे जवान कुयेंगा थिन्नले हे गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’मध्ये (कॅट्स) लढाऊ हेलिकॉप्टरचालनाचे धडे गिरवित होते.
नाशिक : भारत-भूतान या दोन देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधामुळे भूतानच्या सैन्यदलातील काही जवानांना भारतात सैनिकी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. मागील वर्षभरापासून भूतानचे जवान कुयेंगा थिन्नले हे गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’मध्ये (कॅट्स) लढाऊ हेलिकॉप्टरचालनाचे धडे गिरवित होते.
भारताकडे आधुनिक एव्हिएशनची क्षमता असून, येथील चित्ता, चेतक हेलिकॉप्टरचा सरावादरम्यान आलेला अनुभव खूप काही शिकवून गेल्याचे मत थिन्नले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. कॅट्सच्या हवाई तळावर शुक्रवारी वैमानिकांच्या ३० व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी एकूण ४० प्रशिक्षणार्थी वैमानिकांना ‘एव्हिएशन विंग’ कमान्डण्ट ब्रिगेडियर सरबजितसिंग भल्ला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यादरम्यान, थिन्नले यांनाही प्रशिक्षणार्थी म्हणून गौरविण्यात आले. प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या तुकडीसोबत थिन्नले यांनीही संचलन करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना दिली.
सोहळ्यानंतर थिन्नले यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भारतीय सेना आधुनिकतेकडे गतिमान असून, भूतान राष्टÑही त्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे. देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधाला ५० वर्षे पूर्ण होत असून, मला आनंद होत आहे, असे ते म्हणाले.
चार जवान बनले वैमानिक
भूतानने अद्याप एव्हिएशन प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले नाही. आमच्या सेनेकडून काही जवानांना या प्रशिक्षणाची संधी मिळते, असे थिन्नले यांनी सांगितले. भूतानच्या संरक्षणासाठी मला भारतात घेतलेल्या या प्रशिक्षणाचा नक्कीच उपयोग होणार आहे. हा प्रशिक्षण कालावधी व येथे सहकारी प्रशिक्षणार्थींकडून मिळालेली आदराची, सन्मानाची वागणूक अविस्मरणीय अशीच असल्याचे थिन्नले म्हणाले. आतापर्यंत भूतानच्या चार जवानांनी भारतात या प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
हेलिकॉप्टरसोबत सपत्निक सेल्फी सेशन
दीक्षांत सोहळ्यासाठी थिन्नले यांच्या पत्नीदेखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या आवडीच्या चित्ता, चेतक या हेलिकॉप्टरसोबत ‘सेल्फी’ क्लिक केली. दरम्यान, थिन्नले यांनी त्यांच्या पत्नीलाही हेलिकॉप्टरची ओळख करून देत प्रशिक्षण कालावधीदरम्यानच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. सोहळ्यानंतर सहकारी जवानांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.