भुजबळांचा सल्ला डावलून बससेवेची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:55 PM2020-01-22T23:55:47+5:302020-01-23T00:28:42+5:30
नागरिकांवर कराचा बोजा नको म्हणून बससेवेचा फेरविचार करावा, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र, ही सेवा सुरू होणे अटळ आहे.
नाशिक : नागरिकांवर कराचा बोजा नको म्हणून बससेवेचा फेरविचार करावा, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र, ही सेवा सुरू होणे अटळ आहे.
शहर बस वाहतूक सुरू करण्याचे प्रस्ताव आत्तापर्यंत सहा वेळा फेटाळण्यात आले होते. मात्र, राज्यात भाजप-शिवसेना सरकार असताना त्यांनी हा प्रस्ताव पाठविला आणि महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने त्यांना तो मंजूर करावा लागला. त्यानंतर निविदा मागविण्यात आल्याशिवाय परिवहन कंपनी स्थापन करण्यात आली आहे. फेब्रुवारी किंवा फार तर मार्च महिन्यात ही सेवा सुरू होणार असतानाच राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांनी नाशिकसाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या मेट्रो आणि बससेवेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
नागपूरला मेट्रो रिकाम्या धावत असताना नाशिकमध्ये अशी सेवा कितपत उपयुक्त असा प्रश्न त्यांनी केला होता. तसेच बससेवा कायम तोट्यात जाणारी असल्याने त्यासाठी नाशिककरांवर बोजा लादू नका, असा सल्ला त्यांनी दिला होता. मात्र, महापालिका प्रशासनाने दोन ठेकेदारांना लेटर आॅफ अवॉर्ड दिले आहे. यात ट्रॅव्हलटाईम कार रेन्टल प्रा.लि. या ठेकेदार कंपनीला १२० सीएनजी आणि ३० डिझेल बसेस पुरवण्याचे तर सिटी लाइफलाइन या ठेकेदार कंपनीला ८० सीएनजी आणि वीस डिझेल बसेस उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे.
अगोदरच कल्पना देण्यात आली होती...
गेल्या सोमवारी (दि.२०) छगन भुजबळ यांची महापौर सतीश कुलकर्णी यांनी भेट घेतली होती. त्यावेळी या सेवेचा विचार करण्याबाबत फेरविचार करण्याची चर्चा झाली असली तरी बससेवेसाठी निविदा मागवून ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. या सेवेसाठी खूपच पुढे गेले असल्याने माघार घेणे कठीण असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे.