राष्ट्रवादीच्या होर्डिंगवरून भुजबळ गायब

By admin | Published: January 5, 2017 01:50 AM2017-01-05T01:50:16+5:302017-01-05T01:50:31+5:30

गटबाजीला उधाण : ओबीसींकडून स्वतंत्र चूल

Bhujbal disappears from NCP's hoarding | राष्ट्रवादीच्या होर्डिंगवरून भुजबळ गायब

राष्ट्रवादीच्या होर्डिंगवरून भुजबळ गायब

Next

नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपळगाव बसवंत येथे गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याच्या होर्डिंगवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे छायाचित्र वगळण्यात आल्याच्या घटनेने पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली असून, पक्षातील ओबीसी कार्यकर्त्यांकडून सोशल माध्यमावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सदरचा प्रकार मुद्दाम करण्यात आला की होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून भुजबळ यांना दूर ठेवण्याचा पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला याचा उलगडा मात्र झाला नाही.
जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नावाने जिल्ह्णातील ग्रामीण भागात व विशेष करून पिंपळगाव, निफाड तालुक्यात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याच्या फलकावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व संपर्क नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह आयोजक म्हणून ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक अध्यक्ष सचिन पिंगळे व आयोजक माजी आमदार दिलीप बनकर यांचे छायाचित्र आहे. या फलकावर छगन भुजबळ यांचे छायाचित्र नसल्याची बाब भुजबळ समर्थकांच्या व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच, त्यातून वेगवेगळे अर्थ काढून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा तीव्र पाऊस पडला. भुजबळ यांना पक्षाने डावलल्याची भावना व्यक्त करतानाच, राष्ट्रवादीचा खरा चेहरा उघडकीस आला अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. आगामी महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत असून, त्याचाच भाग म्हणून भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कलंकित असलेले छगन भुजबळ यांचे छायाचित्र वगळण्यात आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, फलकातून भुजबळ यांना वगळण्यामागे संबंधितांना जाब विचारला असता, प्रदेश पातळीवरूनच फलक कसा असावा याचे डिझाइन तयार करून देण्यात आल्याने त्यात भुजबळ यांचे छायाचित्र नसल्याचे सांगण्यात आले. प्रदेश पातळीवर पदाधिकारी असलेल्या नाशिक शहरातील राष्ट्रवादीच्या एका आमदाराने या फलकाबाबत महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही सांगण्यात आले.
पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच या प्रकारामुळे पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. पक्षातील ओबीसी नेत्यांची या संदर्भात गुप्त बैठक होऊन पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहावे की नाही यावर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता.

Web Title: Bhujbal disappears from NCP's hoarding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.