आपत्कालीन निधीवरून भुजबळ-कांदे यांच्यात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:18 AM2021-09-12T04:18:52+5:302021-09-12T04:18:52+5:30

नांदगाव : तालुक्यात महापुरामुळे शेती व इतर व्यापारी व्यवसायातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पाहणी ...

Bhujbal-Kande jumped from the emergency fund | आपत्कालीन निधीवरून भुजबळ-कांदे यांच्यात जुंपली

आपत्कालीन निधीवरून भुजबळ-कांदे यांच्यात जुंपली

Next

नांदगाव : तालुक्यात महापुरामुळे शेती व इतर व्यापारी व्यवसायातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पाहणी दौरा व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बैठकीदरम्यान आपत्कालीन निधी व शिवभोजन थाळी यातील तरतुदीवरून आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर पालकमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने कांदे आक्रमक झाले. त्यांनी निधीच्या मुद्द्यावर सरळसरळ पालकमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर शाब्दिक खडाजंगी होऊन बैठक आटोपती घेण्यात आली. दरम्यान, शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर आपत्कालीन निधी मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

बुधवार (दि. ७)पासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाल्यांना मोठे पूर आले. पावसामुळे शेकडो हेक्टर जमिनीतील पीक खराब झाले, तर शेकडो कुटुंबांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे आमदार कांदे सक्रिय झाले होते. गेल्या चार दिवसांपासून पूरग्रस्तांमध्येच व्यस्त असलेले आमदार यांनी बैठकीची औपचारिकता पार पाडण्याच्या प्रकाराला विरोध दर्शवून आक्रमक पवित्रा घेतला. सरसकट सर्व नुकसानग्रस्तांना ठोस शासकीय मदत मिळावी, वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांशी बोलून तालुक्याला भरीव निधी मिळवून देण्याची भूमिका मांडत असताना पालकमंत्री व आमदार यांच्यात खडाजंगी झाली. आपत्कालीन निधीची मागणी करताच पालकमंत्र्यांनी कलेक्टरला ते अधिकार असतात असे सांगितल्याने कांदे संतप्त झाले. शिवाय शिवभोजन थाळीची संख्या १५० वरून थेट ३०० पर्यंत वाढविण्यास पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. नगर परिषदेमार्फत दोन्ही वेळेस मोफत भोजन पूरग्रस्तांना वैयक्तिक खर्चातून देत असल्याचे कांदे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ही भोजन थाळीची संख्या वाढविण्यात आली.

पंचनामे सरसकट व शंभर टक्के करावेत, अशी सूचना कांदे यांनी प्रांताधिकारी सोपान कासार यांना भुजबळ यांचा संदर्भ देऊन केली. तेव्हा भुजबळ यांनी आमदार कांदे यांना ‘मी सांगतोय ना......’ असे सांगत असतानाचा कांदे यांनी तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात, त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला तर जिल्हाधिकारी सहमती दर्शवतीलच असे सांगितले. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी बैठक आटोपती घेतली.

इन्फो

प्रांताच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

कलेक्टर यांची अनुपस्थिती आणि भुजबळ यांनी निधीचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे दाखवलेले बोट हा कांदे व त्यांच्यातील वादाचा कळीचा मुद्दा ठरला. अतिवृष्टी किंवा ढगफुटी झाल्याने घरे वाहून गेली व नुकसान झाले आहे. त्या त्या ठिकाणी शासनाने जिल्हा नियोजन समितीमध्ये खास कलेक्टर आणि पालकमंत्री यांना आपत्कालीन निधीची तरतूद करण्याचे अधिकार दिले आहेत. तो निधी आम्हाला द्यावा. येथे आभाळ फाटले आहे, आम्ही किती दिवस स्वच्छता करणार, पूल बांधायचा आहे, नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करायचे आहे, पूल वाहून गेले, बंधारे फुटले... या सर्व बाबी आपत्कालीन निधीतून झटपट होऊ शकतात, असा कांदे यांचा मुद्दा होता. तातडीने पंचनामे झाले नाहीत तर प्रांतांच्या घराबाहेर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा कांदे यांनी दिला. तसेच पंचनामे सरसकट व्हायला हवेत. अधिकारी प्रक्रियेनुसार काम करतील, परंतु खरी दिशाभूल पालकमंत्री करताहेत. आमचा शेतकरी काय भिकारी आहे का?तो कष्टाने कमवतो, असा आक्षेप कांदे यांनी घेतल्याने मुद्दा अजून गरम झाला.

फोटो- ११ भुजबळ-कांदे

110921\11nsk_47_11092021_13.jpg

फोटो- ११ भुजबळ-कांदे 

Web Title: Bhujbal-Kande jumped from the emergency fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.