भुजबळ उतरले आखाड्यात
By Admin | Published: August 9, 2015 11:29 PM2015-08-09T23:29:33+5:302015-08-09T23:30:46+5:30
सिंंहस्थ कुंभमेळा : नाशिक, त्र्यंबक, कावनाईला भेट
भुजबळ उतरले आखाड्यातसिंंहस्थ कुंभमेळा : नाशिक, त्र्यंबक, कावनाईला भेटनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-महंतांकडून प्रशासनावर होणारे आरोप, आखाड्यातील आपसातील मतभेद आणि पोलीस प्रशासनाकडून नाशिककरांची होणारी अडवणूक या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री छगन भुजबळ आता आखाड्यात उतरले आहेत. भुजबळ यांनी कावनाई, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील आखाड्यांना भेटी देऊन येणारे भाविक आणि साधूंना चांगल्या सुविधा देणे हे यजमान म्हणून आपली जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.
भुजबळ यांनी त्र्यंबक येथील बडा उदासीन आखाडाचे प्रमुख रघुमुनीजी महाराज, निरंजनी आखाड्याचे प्रमुख नरेंद्रगिरी महाराज, अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे महंत सागरानंद महाराज, महंत हरिगीरीजी महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांच्या भेटी घेतल्या.
याप्रसंगी भुजबळ यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आपण सक्रिय झाल्याचे संकेत देत संपूर्ण साधुग्रामची पाहणी केली. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. या सर्व भाविकांना पर्यटकांना मोठ्या प्रमाणवर सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. येणाऱ्या भाविक व पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार असून, आर्थिक उलाढालही होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी -सुविधा देणे आपले काम आहे. सर्व पक्ष व विविध गट, स्वयंसेवक यांनी एकत्र येऊन हा पवित्र सोहळा पार पाडावा, असे आवाहनदेखील भुजबळ यांनी केले.
यावेळी बडा उदासीन आखाड्याचे प्रमुख महंत रघुमुनी महाराज यांनी सांगितले की, आम्ही छगन भुजबळ यांचे पाहुणे आहोत. त्यामुळे हा कुंभमेळा चांगल्याप्रकारे होईल यात शंका नाही. मात्र, प्रशासनाकडून पाहिजे त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रशासन कमी पडत आहे. हरिगीरीजी महराज यांनीही सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रशासनाकडून सुविधांचा अभाव असल्याचे सांगितले.
यावेळी छगन भुजबळ यांनी त्र्यंबक नगरपरिषदेला भेट दिली. नगराध्यक्ष अनघा फडके, योगेश तुंगार, माधुरी जोशी आदि नगरसेवकांनी त्यांचे सत्कार करून स्वागत केले. यावेळी भुजबळ यांनी कुंभमेळ्यात भाविकांना चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा देण्याचे आवाहन केले.
भुजबळ यांनी कामांची केलेली पाहणी, यजमान म्हणून भाविक आणि साधूंसाठी करावयाच्या सुविधा याविषयी विधान केल्यामुळे साधुग्रामच्या समस्या सुटू शकतील, असा विश्वास अनेक साधू-महंतांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, दिलीप खैरे, परवेज कोकणी, अॅड. संदीप गुळवे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, गोरख बोडके, सुनील वाजे, उदय जाधव, बाळासाहेब गाढवे, कैलास घुले, बिहरू मुळाने, पुरुषोत्तम कडलक आदि मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)