भुजबळ-शेट्टी भेटीत भाजपाच्या पराभवासाठी खल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 01:47 AM2019-03-17T01:47:23+5:302019-03-17T01:47:57+5:30
शेतकरी मेळाव्यासाठी नाशिक भेटीवर आलेले शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी दुपारी राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुमारे वीस मिनिटे बंद दाराआड चाललेल्या या चर्चेत फक्त भाजपाचा पराभव करण्यावरच चर्चा झाल्याचे शेट्टी यांनी नंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
नाशिक : शेतकरी मेळाव्यासाठी नाशिक भेटीवर आलेले शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी दुपारी राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
सुमारे वीस मिनिटे बंद दाराआड चाललेल्या या चर्चेत फक्त भाजपाचा पराभव करण्यावरच चर्चा झाल्याचे शेट्टी यांनी नंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
खासदार शेट्टी यांची निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे रात्री जाहीरसभा असल्याने त्यानिमित्ताने दुपारी त्यांचे नाशिक येथे आगमन झाले. त्यावेळी त्यांनी भुजबळ यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुमारे वीस मिनिटे बंद खोलीत छगन भुजबळ, राजू शेट्टी व समीर भुजबळ या तिघांनी चर्चा केली. त्यानंतर शेट्टी प्रसिद्धीमाध्यमांसमोर गेले. ते म्हणाले, कॉँग्रेस-राष्टÑवादीबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी झाली असून, आम्ही तीन जागा मागितल्या होत्या, त्यातील दोन जागा देण्याची तयारी आघाडीने दर्शविली. राष्टÑवादीने त्यासाठी हातकणंगले ही जागा आमच्यासाठी सोडली आहे, आता काँग्रेसच्या कोट्यातील जागेबाबत चर्चा सुरू असून, वर्धा किंवा सांगली असा पर्याय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कॉँग्रेस पक्षाकडे दिला आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत कॉँग्रेस पक्ष आपला निर्णय कळविणार आहे.
भुजबळ यांच्या भेटीत फक्त राजकीय चर्चा झाली. देशातील हुकूमशाही गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे शेट्टी म्हणाले.