भुजबळ पिता-पुत्राच्या नावाने फोन करून फसवणुकीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 01:29 AM2021-10-02T01:29:19+5:302021-10-02T01:30:36+5:30
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले सुनील झंवर यांचा मुलास पालकमंत्री छगन भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या नावाने फोन करण्यात आल्याचा आणखी एक प्रकार समोर आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले सुनील झंवर यांचा मुलास पालकमंत्री छगन भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या नावाने फोन करण्यात आल्याचा आणखी एक प्रकार समोर आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात इसमाने छगन भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या नावाने फोन करून ‘तुम्ही माझे एक काम करून द्या, मी तुमचे काम करून देतो’ असे सांगत फसवणूक केली असून या प्रकरणात जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे नाव वापरण्यात आले आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांतर्गत येरवडा तुरुंगात असलेले सुनील झंवर यांचा मुलगा सूरज झंवर उच्च न्यायालयात कामानिमित्त गेलेले असताना त्यांना ९४२३४२११११ या क्रमांकावरुन फोन आला. मी पंकज भुजबळ बोलत असून तुम्ही ८ सप्टेंबर २०२१ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मला येऊन भेटा, असे सांगत फोन बंद केला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून फोन करुन पंकज भुजबळांचा पीए बोलत असल्याचे सांगत अजून तुम्ही जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले नाही. कलेक्टर साहेबांचा पीए वाट पाहत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळांतच जळगाव येथील एका लँडलाईन क्रमांकावरून फोन करत ‘मी अभिजित राऊत (जळगाव कलेक्टर) बोलत अससल्याची बतावणी करत तुमचे काही काम आहे का? अशी विचारणा केली. त्यावर झंवर नाही म्हटल्याने त्याने फोन ठेवला. त्यानंतर त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेत त्यांना या प्रकारासंदर्भात चौकशी केली त्यांना या गोष्टीची माहिती नसल्याचे समोर आल्याने या प्रकरणात फसवणूक झाल्याचे उघड झाले असून अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांनी फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट -
भुजबळांच्या नावाने यापूर्वीही फसवणुकीचा प्रकार
भुजबळसाहेबांच्या बंगल्यावरून बोलत असल्याची बतावणी करत भुजबळ यांची बदनामी व कासुर्डे यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अंबड पोलिसांनी अटक केली होती. संशयित महेंद्र पाटील (रा. गंगापूर रोड,नाशिक) याने बुधवारी (दि. १८ ऑगस्ट)ला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास
उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी कासुर्डे यांना मोबाइल करून एका प्रकरणात मदत करण्याचे आश्वासन देत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने कासुर्डे यांना फोनवर संभाषण करणाऱ्या संशयित महेंद्र पाटील याच्याविरोधात भुुजबळ यांच्या कार्यालयातील अधिकारी महेंद्र पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.