भुजबळांची हॅट्ट्रिक

By admin | Published: October 19, 2014 09:38 PM2014-10-19T21:38:30+5:302014-10-20T00:42:42+5:30

भुजबळांची हॅट्ट्रिक

Bhujbal's hat-trick | भुजबळांची हॅट्ट्रिक

भुजबळांची हॅट्ट्रिक

Next

येवला : विकासाच्या अनुभवाला व भावी विकासाच्या नांदीला मतदारांनी जोरदार समर्थन देत तब्बल ४६ हजार ४४२ मतांची निर्णायक आघाडी घेत राष्ट्रवादीचे राज्यातील हेवीवेट नेते छगन भुजबळ यांनी येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा विजय नोंदवत हॅट्ट्रिक साधली.
येवला - बाभूळगाव रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रविवारी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभी पोस्टाद्वारे आलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाली. अवघ्या १५ मिनिटांत पहिल्या फेरीचा निकाल हाती आला. दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे संभाजी पवार यांनी ६०१ मतांनी आघाडी घेतली. हाही अपवादवगळता अन्य वीस मतमोजणीच्या फेऱ्यांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी निरंतर आघाडी घेत निर्विवाद ४६,४४२ मतांच्या फरकाने विजयावर शिक्कामोर्तब केले.
येवला - लासलगाव विधानसभा मतदारसंघात एक लाख ९३ हजार ८३१ मतदान झाले होते. निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे प्रशिक्षण घेतलेले व मतदारांना मतदान कसे करायचे याचे ज्ञान देणारे व उच्च शिक्षित ६४८ टपाली मतदारांपैकी तब्बल ५६ मतपत्रिका बाद ठरल्या हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. छगन भुजबळ यांना तब्बल १,१२,७८७ मते पडली व त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांनी ६६,३४५ मते घेतली. तसेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिवाजी मानकर यांना ९३३९ मते मिळाली. उर्वरित अन्य १० उमेदवारांना पडलेली मते अशी, पौलस कारभारी अहिरे (बसपा) ११०१ मते, निवृत्ती महादू लहरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) ८५५, दीपक शशिकांत लाठे (बमुपा) २०८, अपक्ष उमेदवार संजय सोनवणे १२५, अभिजित गायकवाड ५७५, सुनील घोडेराव १४८, दत्तात्रय चव्हाण १८१, पुष्पा बनसोडे ४०७, शेख अ. फकीर मो. ५३५, याशिवाय ८७६ मतदारांनी नकाराधिकाराचा (नोटा) वापर करून कोणताही उमेदवार योग्य नसल्याने स्पष्ट केले. एकूण मतदानाच्या सहाव्या हिश्श्याएवढी मते भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पार्टी यांच्यासह ११ अपक्ष उमेदवार घेऊ न शकल्यामुळे त्यांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे प्रतिनिधी मतमोजणीचे ठिकाणी प्रत्येक टेबलजवळ बारकाईने आकडेवारी घेण्यात मग्न होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक चिटणीस अ‍ॅड. माणिकराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे, सचिन कळमकर तसेच शिवसेनेचे बापू काळे, झुंजार देशमुख यांच्यासह प्रमुख मंडळी मतमोजणी कक्षात उपस्थित होती. मतमोजणी कक्षाशेजारी मीडिया सेंटरची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक फेरीची आकडेवारी फलकावर लिहिली गेल्यामुळे मीडियाची चांगली सोय झाली. परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Bhujbal's hat-trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.