भुजबळांच्या सरबत्तीने अधिकाऱ्यांची घाबरगुंडी
By श्याम बागुल | Published: August 24, 2018 03:57 PM2018-08-24T15:57:08+5:302018-08-24T16:01:37+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणून गंगापूर धरणावर आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या ४८ दर्जेदार बोटी आणल्या होत्या त्या कुठे आहेत अशाी विचारणा केल्यावर त्यांना कोणीही उत्तर दिले नाही. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी काही अधिका-यांना
नाशिक : जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत दिड महिन्यांपुर्वी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिका-यांची बैठक घेवून प्रश्नांची सरबत्ती केली. बोटक्लबच्या बोटी, मांजरपाड्याचे रखडलेले काम, रस्त्यांची झालेली दुरावस्था, टॅँकर देण्यास होणा-या विलंबाबाबत भुजबळ यांनी विचारणा केली असता भांबावलेल्या अधिका-यांनी कसे बसे उत्तरे देवून मान सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासन व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करीत थेट प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणून गंगापूर धरणावर आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या ४८ दर्जेदार बोटी आणल्या होत्या त्या कुठे आहेत अशाी विचारणा केल्यावर त्यांना कोणीही उत्तर दिले नाही. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी काही अधिका-यांना फोन करून माहिती घेतली व १२ बोटी असल्याचे सांगितले. परंतु उर्वरित बोटी कुठे आहेत याचे उत्तर मिळत नसल्याचे पाहून भुजबळ यांनी, बोटी चोरीला गेल्या असतील तर गुन्हे दाखल करा अशी सुचना केली. बोट क्लब, कलाग्रामसारख्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता, हा सरकारी पैसा आणि वेळेचा अपव्यय नाही का अशी विचारणाही त्यांनी केली.
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकर वेळेवर दिले जात नाही, प्रमुख व जिल्हा मार्गावील रस्त्याची दुरावस्था झाली असून, बॅँकाकडून पीक कर्ज मिळत नसल्याने शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यावर भुजबळ यांनी अधिका-यांना विचारणा केली. तसेच मांजरपाडा, बोटक्लब, कलाग्राम यासह रखडलेल्या प्रकल्पांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील रस्त्याची दुरावस्था झाली असून महामागार्वर दोन दिवसांपूर्वी खड्यात पडून तरूणाचा मृत्यू झाल्याचे उदाहरण देत भुजबळ यांनी, रस्ते दुरुस्तीची मागणी केली. त्यावर बांधकाम विभागाच्या आधिका-यांनी पी-१ ते पी-५ असे रस्त्याचे प्रकार असून त्यांच्या वर्गीकरणाप्रमाणे दुरुस्ती होते. असे सांगण्याचा प्रयत्न केला, त्यावर भुजबळ यांनी तोपर्यंत लोकांनी काय करायचे अशी विचारणा केली. जिल्ह्यात रस्त्याची काय अवस्था आहे, याची माहीती घ्या. मी बांधकाम विभागाचा मंत्री होतो त्यामुळे रस्त्याचे नियम तुम्ही मला सांगणार का, अशा शब्दात अधिका-यांना सुनावले. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यासह विविध विभागाचे आधिकारी उपस्थित होते.