भुलाबाईच्या खेळाने महिलांना दिला आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:14 AM2019-09-24T01:14:20+5:302019-09-24T01:14:36+5:30
कुणी नऊवार साड्या तर कुणी सहावार साड्यांसह अस्सल मराठी साजशृंगार करून आलेल्या विविध वयोगटातील महिलांनी भुलाबाईची गाणी म्हणत आणि त्यावर नृत्य करीत त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उत्कृष्टपणे खेळ खेळत बक्षिसे जिंकत आनंद द्विगुणित केला.
नाशिक : कुणी नऊवार साड्या तर कुणी सहावार साड्यांसह अस्सल मराठी साजशृंगार करून आलेल्या विविध वयोगटातील महिलांनी भुलाबाईची गाणी म्हणत आणि त्यावर नृत्य करीत त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उत्कृष्टपणे खेळ खेळत बक्षिसे जिंकत आनंद द्विगुणित केला.
समर्थ मंगल कार्यालयात अवर महिला मंडळाच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात महानगराच्या विविध भागांमधून आलेल्या ३०० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. महानगरातील या महिलांच्या १४ गटांमध्ये स्पर्धा रंगल्या होत्या. या महिलांनी भुलाबाईच्या स्वरचित गाण्यांचे सादरीकरण केले. त्यानिमित्ताने विस्मृतीत जात असलेल्या भुलाबाईच्या उत्सवाची परंपरा कायम राखण्याचादेखील प्रयास करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या गटांना ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, संस्थेच्या अध्यक्षा मानसी देशपांडे, सचिव रेवती कुरुंभट्टी, विभाकर कुरुंभट्टी आणि परीक्षक अनघा धोडपकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सचिन कुलकर्णी, प्रमोद पुराणिक आणि दीप्ती कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. अंजली शेवडे यांनी भुलाबाई उत्सवाची माहिती दिली. उत्कर्ष कुरुंभट्टी यांनी संस्थेची माहिती दिली. श्रुती देशपांडे यांनी प्रास्ताविक, प्रियांका गीत-पवार यांनी स्वागत तर स्नेहा पाटील यांनी आभार मानले. स्नेहल काळे आणि अंजली पाटील यांनी बहारदार सूत्रसंचालन करीत कार्यक्रमाची रंगत वाढवली. विजेत्या महिलांच्या तीन गटांना तसेच लकी ड्रॉद्वारे भाग्यवान ठरलेल्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.