त्र्यंबक देवस्थानच्या दर्शन मंडपाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 01:19 AM2021-10-16T01:19:40+5:302021-10-16T01:20:06+5:30
मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाच परमेश्वर मानून त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.
त्र्यंबकेश्वर : मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाच परमेश्वर मानून त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या नूतन दर्शन मंडपाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा अति. सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती फडतरे यांच्यासह विश्वस्त दिलीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, संतोष कदम, पंकज भुतडा, सौ. तृप्ती धारणे व भूषण अडसरे उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर देवस्थान भाविकांसाठी मंदिराच्या पूर्व दरवाजाला दर्शन मंडप साधारण ११ लाख रुपये भाड्याने घेत असे. पुरातत्व विभागाच्या जाचक अटींमुळे सर्व सुविधांयुक्त आरसीसी मंडप उभारता येणे शक्य नव्हते. शेवटी पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार भाविकांसाठी सर्व सुविधांयुक्त ४५ बाय ४० या आकाराचा भव्य शामियाना (मंडप) उभारता येणार असून, लोखंडी शेड टाइप मंडप मंदिराच्या ढाच्याला धक्का न लावता करण्यात येणार आहे. या मंडपात भाविकांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, फिडिंग रूम, कॅन्टीन, विद्युत व्यवस्था, शुद्ध हवेसाठी पंखे आदी व्यवस्थेसह रांगेत बसण्याची सोय अशा सुविधांयुक्त या मंडपाची अंदाजित किंमत दोन कोटी रुपये असल्याचे समजते. आता दरवर्षी देवस्थानला मंडप/शामियाना भाड्याने घेण्याची गरज पडणार नाही. यावेळी संतोष कदम, भूषण अडसरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विश्वस्त तथा पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी केले.
इन्फो
आनंदसागरच्या धर्तीवर प्रयोग
देवस्थानचे चेअरमन न्या. विकास कुलकर्णी यांनी बिल्वतीर्थ परिसरात असलेल्या जागेत गजानन महाराज संस्थानच्या आनंद सागरच्या धर्तीवर
प्रयोग साकारणार आहे. तसेच आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा उभारण्याचा मानस असून, पहिल्यांदा भव्य असे मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल उभारून, त्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देवस्थानचे अन्नछत्र उभारण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.