संमेलनाध्यक्षपदी भूमिपुत्र मनोहर शहाणे यांना मिळावा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:49+5:302021-01-20T04:15:49+5:30
नाशिकमध्ये होत असलेल्या साहित्य संमेलनासाठी रोजच नवनवीन नावे चर्चेत येत आहेत. ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचे नाव चर्चेत तर ...
नाशिकमध्ये होत असलेल्या साहित्य संमेलनासाठी रोजच नवनवीन नावे चर्चेत येत आहेत. ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचे नाव चर्चेत तर आहेच, परंतु आता नाशिकमधील आयाेजक संस्था त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. या मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत प्रयोगशील कथाकार, नाटककार, कादंबरीकर मनोहर शहाणे यांच्या नावाचा प्रस्ताव संमत झाला आहे. त्यादृष्टीने हा प्रस्ताव मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आणि सचिव सुभाष पाटील यांनी दिला आहे. सत्यकथेसारख्या वाड्मयीन नियतकालिकात लेखन करणाऱ्या शहाणे यांनी ११ कादंबऱ्या, चार कथासंग्रह लिहिलेले आहेत. नाटक आणि एकांकिका देखील त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांच्या साहित्यावर विद्यापीठ स्तरावर संशोधन देखील झाले आहे. राज्य नाट्य स्पर्धेत शहाणे यांनी लिहिलेल्या आणि लेाकहितवादी मंडळाच्यावतीने सादर केलेल्या अनेक नाटकांना राज्यस्तरावर प्रथम आणि व्दितीय क्रमांकाची बक्षिसे देखील मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार करावा अशी आग्रही विनंती लोकहितवादी मंडळाने केली आहे.
दरम्यान, नाशिकच्या याच संस्थेकडे यजमानपद असल्याने सध्या संमेलनाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. या संमेलनासाठी तब्बल चाळीस समित्या स्थापन करण्यात येणार आहे. यात सल्लागार समिती, पदाधिकारी व कार्यकारिणी समिती सदस्य, स्वागत समिती, निधी संकलन समितीपासून आपत्तकालिन नियोजन समिती अशा प्रकारच्या तब्बल चाळीस समित्यांचे गठण करण्यात येणार असून त्या दृष्टीने इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.