भाऊराया ओवाळीते अन् विनविते तुला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:46 AM2018-08-26T00:46:41+5:302018-08-26T00:47:05+5:30
‘रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यातील विश्वास अधिकाधिक वृद्धिंगत करणारा सण. या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी जी मागील अनेक वर्षांपासून ‘आधारतीर्थ’ या आश्रमाची कन्या आहे,
नाशिक : ‘रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यातील विश्वास अधिकाधिक वृद्धिंगत करणारा सण. या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी जी मागील अनेक वर्षांपासून ‘आधारतीर्थ’ या आश्रमाची कन्या आहे, तिने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला युवासेनेचे आदित्य ठाकरे यांना राखी बांधून सरकारकडून आम्हा निराधार मुलांना ‘आधार’ मिळवून देण्याची विनवणी वजा ‘गिफ्ट’ मागितले. शिवसेनेच्या वतीने आयोजित स्वसंरक्षणार्थ उपाययोजना शिबिरप्रसंगी शनिवारी (दि.२५) शहरातील हनुमानवाडी लिंकरोडवरील एका लॉन्समध्ये आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ठाकरे यांनी आपल्या शैलीत विद्यार्थिनींच्या समूहात जाऊन ‘सेल्फी’ क्लिक केली. यावेळी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आधारतीर्थ आश्रमाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून राज्य सरकारकडे या आश्रमाच्या वतीने शासीकय अनुदान मंजूर होण्याबातचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; मात्र हा प्रस्ताव अद्याप लालफितीत अडकलेला आहे. त्यामुळे समाजातील दानशुरांच्या मदतीवरच राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचा उदरनिर्वाह होत आहे. दानशुरांची मदत जरी होत असली तरी आश्रमातील मुला-मुलींची संख्या लक्षात घेता ती अपुरी पडते, अशी व्यथा पल्लवी पवार हिने यावेळी ठाकरे यांच्याशी संवाद साधताना मांडली.
तसेच त्यांना हात जोडून विनवणी करीत सरकारदरबारी या समस्येचा तातडीने तोडगा काढण्याचे गाºहाणेही बहिणीच्या नात्याने त्यांच्याकडे केले. यावेळी त्यांचे औक्षण करून पल्लवीने ठाकरे यांच्या मनगटावर राखी बांधली. ‘मी शेतकरी कुटुंबातील मुलगी असून, वडिलांनी आत्महत्या केली आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले. माझ्यासारखे माझे अनेक भाऊ-बहिणी आधारतीर्थ आश्रमात निवासी आहे. आमच्या आश्रमाच्या प्रस्तावाची फाईल मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, आपण लक्ष घालून ती मंजूर करून आम्हाला आधार द्यावा’ अशी हात जोडून पल्लवीने ठाकरे यांना विनवणी केली. यावेळी तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता.