भऊरला सापडले बिबट्याचे बछडे
By admin | Published: February 27, 2016 10:19 PM2016-02-27T22:19:50+5:302016-02-28T00:04:14+5:30
घबराट : मादीचा शोध घेण्याची मागणी
भऊर/लोहोणेर : देवळा तालुक्यातील विठेवाडी व भऊर गावाच्या सीमेवर आज सकाळी नानाजी सुकदेव पवार याच्या शेतात बिबट्याचे सुमारे तीन दिवसाचे बछडे सापडल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की, भऊर शिवारातील शेतकरी नानाजी सुकदेव पवार याच्या मालकीच्या शेतात वसाका कारखान्याची ऊसतोडणी चालू असताना सकाळी बिबट्याचे मादी जातीचे सुमारे तीन दिवसाचे बछडे आढळून आले. यामुळे एकच घबराट निर्माण झाली. काही वेळेकरिता ऊसतोडणीचे काम बंध करण्यात आले होते.
दरम्यान, यथील टिंकू निकम याने वन खात्याला सदर घटनेची माहिती दिली. वन खात्याचे वनरक्षक आर. एस. गुंजाळ, एम. के. देवरे, ए. टी. मोरे. राहुल बच्छाव, पी.एन. भामरे, के. टी. गांगुर्डे आदि तातडीने घटनास्थळी हजर झाले. सदर बिबट्याचे बछडे वन खात्याने ताब्यात घेतले असून, आज रात्री ते पुन्हा पूर्ववत जागेवर ठेवण्यात येणार आहे. मादी परत न आल्यास याठिकाणी पिंजरा लावण्यात येईल, असे वन खात्याच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. (वार्ताहर)