भुसावळ-पुणे एक्स्प्रेस दौंडमार्गेच धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:06 AM2020-01-13T01:06:44+5:302020-01-13T01:09:08+5:30
भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस १६ ते २० जानेवारीपर्यंत नाशिकरोड ऐवजी मनमाड-दौंड मार्गे भुसावळहून पुण्याला आणि पुण्याहून भुसावळला जाणार आहे.
नाशिकरोड : भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस १६ ते २० जानेवारीपर्यंत नाशिकरोड ऐवजी मनमाड-दौंड मार्गे भुसावळहून पुण्याला आणि पुण्याहून भुसावळला जाणार आहे.
दक्षिण पूर्व घाटात पायाभूत सुविधांचे काम सुरू आहे. त्यामुळे या गाडीच्या मार्गात बदल करण्यात आल्याचे रेल्वेने कळविले आहे. मध्य रेल्वेने २० जानेवारीपर्यंत कर्जत आणि मंकी हिल दरम्यान रेल्वे रु ळाचे काम हाती घेतले आहे. खचलेला रेल्वेमार्ग बदलण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. गेल्या १ नोव्हेंबर २०१९ पासून भुसावळ-पुणे एक्स्प्रेस मनमाड-दौंड मार्गे भुसावळहून पुण्याला आणि पुण्याहून भुसावळला अशी धावत असून, गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिकमार्गे धावत नाही.
पुण्याला जाण्यासाठी नाशिककरांना थेट दुसरी गाडी नाही. त्यांना चौपट भाडे मोजून एसटी किंवा खासगी वाहनाने जावे लागत आहे. सदर गाडी १५ जानेवारीपर्यंत नाशिकमार्गे धावणार नाही हे आधीच जाहीर झाले होते. आता २० जानेवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
गेल्या डिसेंबरपासून नाशिककरांना भुसावळ-पुणे गाडीने प्रवास करणे कठीण झाले आहे. अनेकांना मनमाडला जाऊन गाडी पकडावी लागते किंवा अन्य मार्गाचा अवलंब करावा लागतो. यासंदर्भात प्रवाशांनी अनेकदा रेल्वे प्रशासनाला जाब विचारला असताना दोनदा गाडी नियमित सुरू करण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित तारखांना पुन्हा गाडीचा मार्ग बदलण्यात आल्याचे कळविण्यात आले होते.
आताही १५ जानेवारीची गाडी २० जानेवारीपर्यंत दौंडमार्गेच सोडण्याचे कळविण्यात आले आहे.