विंचुरदळवी परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 05:41 PM2019-12-19T17:41:09+5:302019-12-19T17:42:22+5:30
विंचुरदळवी : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विंचुरीदळवी परीसरात भगूर-पांढुर्ली रोडलगतचा परिसर बुधवारी (दि.१८) बिबट्याच्या डरकाळ्यांनी दणाणून गेला होता. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
भगूर-पांढुर्ली रोडलगत रमेश एकनाथ कानडे यांची गट क्र. ६४० येथे शेती आहे. शेतात कानडे यांचा बंगला असून बंगल्याच्या मागील बाजूस उसाची शेती आहे. नेहमीप्रमाणे कानडे कुटुंब सकाळी टोमॅटोच्या पिकातील तार व बांबू काढण्याचे काम करत होते. त्यावेळी त्यांना उसामधून काहीतरी आवाज झाल्याचे जाणवल्याने त्यांनी काम बंद करून घरी जाणे पसंत केले. त्यानंतर बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज येऊ लागला. सकाळपासून डरकाळ्यांनी परिसर दणाणून सोडल्यामुळे परिसरातील शेतकरी दहशतीखाली आहेत. या भागात तत्काळ पिंजरा लावून सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली आहे.