सायकल चळवळ : नाशिकमध्ये श्रमिक सायकलचालकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:44 PM2018-04-14T13:44:50+5:302018-04-14T13:44:50+5:30
श्रमिकांची सायकल रॅली सकाळी आठ वाजता महात्मानगर मैदानापासून सुरू झाली. यावेळी फाउण्डेशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, किरण चव्हाण, डॉ. मनीषा रौंदळ यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते. महात्मानगर मैदान येथे मोठ्या संख्येने श्रमिक पुरूष, महिला सायकलींसोबत एकत्र आल्या.
नाशिक : शहरात सायकल चळवळ अधिकाधिक रुजली असून सायकलचळवळीचा विकास व्हावा, यासाठी विविध कार्यक्रमांमधून सातत्याने समाजापुढे नाशिककर ‘सायकल’ आणण्याचा प्रयत्न करतात. नाशिक सायकलस्टि फाऊण्डेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सकाळी शहरातील विविध श्रमिक सायकलचालकांची रॅली काढून सन्मान केला.
श्रमिकांची सायकल रॅली सकाळी आठ वाजता महात्मानगर मैदानापासून सुरू झाली. यावेळी फाउण्डेशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, किरण चव्हाण, डॉ. मनीषा रौंदळ यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते. महात्मानगर मैदान येथे मोठ्या संख्येने श्रमिक पुरूष, महिला सायकलींसोबत एकत्र आल्या. दरम्यान, उपस्थित पदाधिकाऱ्यांनी श्रमिकांच्या या सायकल रॅलीला झेंडा दाखवून उत्साहात प्रारंभ केला. कॉलेजरोड, गंगापूर रोडवरुन रॅली मार्गस्थ झाली. या रॅलीनंतर सहभागी श्रमिक सायकलस्वारांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
घरकाम करून आपल्या कुटुंबाचा आधार बनलेल्या अनेक महिला कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. सायकलिंगचा प्रचार करताना प्रामुख्याने या महिलांचा सत्कार होणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे रॅली काढण्याचा विचार झाल्याचे नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी सांगितले. यासाठी गौरी समाज कल्याण संस्थेच्या रोहिणी नायडू यांचे सहकार्य मिळाले.
दरम्यान, नाशिकमध्ये सुरु असलेल्या या सायकल चळवळीला गती देण्यासाठी आता पुढचे पाऊल म्हणून दहा विभागात दहा प्रमुख कमिटी काम करेल अशी संकल्पना पुढे आली आहे. शहरातील दहा प्रमुख विभागात एका प्रमुखाच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समितीचा संघ काम करणार आहे. या संदर्भात जबाबदारी स्वीकारणा-या सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांचा पदग्रहण सोहळा श्रमिक रॅली व सन्मान सोहळ्यानंतर पार पडला.
त्याचप्रमाणे यावेळी नाशिक सायकलिस्ट पंढरपूर सायकल वारी साठी आॅनलाईन नोंदणीचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.