अवयवदान जनजागृतीसाठी सायकल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:02 AM2018-12-20T01:02:48+5:302018-12-20T01:03:09+5:30

अवयवदान जनजागृतीचा संदेश देण्यासाठी राजेंद्र सोनवणे-नाशिक, किसन ताकमोडे- अहमदनगर, गणेश नरसाळे- सोलापूर, सूरज कदम-सातारा या चार जिल्ह्यातील चार समविचारी मित्रांनी पुणे ते आनंदवन ही सुमारे एक हजार किलोमीटरची सायकल यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

 Bicycle ride for organism mass awareness | अवयवदान जनजागृतीसाठी सायकल यात्रा

अवयवदान जनजागृतीसाठी सायकल यात्रा

Next

नाशिक : अवयवदान जनजागृतीचा संदेश देण्यासाठी राजेंद्र सोनवणे-नाशिक, किसन ताकमोडे- अहमदनगर, गणेश नरसाळे- सोलापूर, सूरज कदम-सातारा या चार जिल्ह्यातील चार समविचारी मित्रांनी पुणे ते आनंदवन ही सुमारे एक हजार किलोमीटरची सायकल यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली.  ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत या यात्रेचे आयोजन करण्यात आले. मृत्यूनंतरही अवयवदानाद्वारे इतरांना जीवनदान देता येते, हा संदेश या यात्रेच्या माध्यमातून या चार सायकलपटूंनी ठिकठिकाणी दिला. गत चार वर्षांपासून या यात्रेचे आयोजन या युवकांकडून केले जाते. दरवर्षी नवा सामाजिक संदेश सायकलयात्रेतून देण्याचा या चार मित्रांचा प्रयत्न असतो. पुण्यातील शनिवारवाडा येथून यात्रेस प्रारंभ करण्यात आला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, हिवरे बाजारचे पोपटराव पवार, पाटोदा आदर्श गावचे भास्करराव पेरे, आनंदवनचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, डॉ. भारतीताई आमटे, कौस्तुभ आमटे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनीताई आमटे, अनिकेत आमटे या मान्यवरांनी या सायकल यात्रेचे स्वागत केले.
आमटे यांच्या प्रकल्पाने विद्यार्थी भारावले
यात्रेदरम्यान राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, पाटोदा या आदर्श गावांसहित अहमदनगर येथील स्नेहालय, पवनार येथील आचार्य विनोबा भावे आश्रम, वर्धा येथील सेवाग्राम आश्रम, डॉ. प्रकाश आमटे यांचा गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा प्रकल्प या विविध सामाजिक संस्थांना भेटी दिल्या. तसेच बुलढाणा, औरंगाबाद, वाशीम, जालना, यवतमाळ, लाड कारंजा, कळंब, वर्धा येथेही भेटी देऊन शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्थांमध्ये अवयवदान जनजागृतीचा जागर करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आनंदवन या महारोगी सेवा समितीच्या, कुष्ठरोगी बांधवांच्या पुनर्वसनासाठी बाबा आमटे यांनी साकारलेल्या प्रकल्पावर यात्रेचा समारोप करण्यात आला.

Web Title:  Bicycle ride for organism mass awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.