२० मिनीबस, २००० टायर्सची लागणार बोली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:25+5:302020-12-22T04:14:25+5:30
नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या भंगार साहित्य, वाहनांचे सुटे भाग तसेच नादुरुस्त वाहनांच्या लिलाव प्रक्रियेसाठी महामंडळाकडून साहित्यांची ...
नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या भंगार साहित्य, वाहनांचे सुटे भाग तसेच नादुरुस्त वाहनांच्या लिलाव प्रक्रियेसाठी महामंडळाकडून साहित्यांची मांडणी करण्यात आली आहे. या लिलावात २०० भंगार गाड्या, २० मिनी बस तसेच सुमारे २ हजार टायर्ससाठी बोली लागणार आहे.
प्रवासी वाहतुकीचे सर्वात मोठे जाळे असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून भंगार साहित्यांचा लिलाव केला जातो. मागीलवर्षी एप्रिल महिन्यात लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर साधारणपणे दीड वर्षाने एस.टी. महामंडळाकडून लिलाव केला जात आहे. पेठरोडवरील कार्यशाळेत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून ज्यांना या प्रक्रियेत सहभाग घ्यायचा आहे त्यांना साहित्य पाहण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसाार भंगार झालेल्या किंवा रस्त्यावर चालविण्यास सक्षम नसलेल्या गाड्यांचा लिलाव काढण्यात आलेला आहे. त्यानुसार सुमारे २०० भंगार गाड्यांवर बोली लागणार आहे. त्याबरोबरच दाेन हजार टायर्स, २० मिनी बस, ५ हजार टन रबर, ८५ टन लोखंड, १२ टन ॲल्युमिनियम, ६५ टन गाड्यांचे सुटे भाग, १३०० बॅटरी आदी अनेक प्रकारचे जुने झालेले साहित्य लिलावात काढण्यात येणार आहे.
सदर लिलाव हे ऑनलाईन पद्धतीने होणार असून, त्यासाठीचे महामंडळाने ॲप तयार केले आहे. त्या माध्यमातून साहित्यांची माहिती कळणार असून छायाचित्रे देखील बघता येणार आहे. ऑनलाईच्या माध्यमातूनच बोलीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
--इन्फो--
महामंडळ प्रथमच राबविणार प्रक्रिया
राज्य परिवहन महामंडळाकडून यंदा प्रथमच लिलाव प्रक्रिया स्वता राबविणार आहे. यापूर्वी खासगी यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्शन केले जात होते. दोन टक्के कराराने खासगी संस्थेला मोबदला मिळत होता, परंतु हाेता यंदा मध्यस्थ वगळण्यात आल्यामुळे महामंडळाला थेट उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
==इन्फो--
नाशिक विभागातील गाड्यांची देखभाल दुरुस्ती ही पेठरोड येथील वर्कशॉपमध्ये केली जाते. गाड्यांची डागडुजी तसेच दुरुस्तीची कामे येथे चालतात तसेच डेपोकडून मागणी होणारे सुटे भाग आणि अन्य साहित्य येथून पाठविले जाते.