सार्वजनिक ठिकाणी खुशाल ओढा बिडी-सिगारेट; दंडच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:42 AM2021-01-08T04:42:37+5:302021-01-08T04:42:37+5:30
नाशिक : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी सध्या अस्वच्छता करणारे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाईचा जेार सुरू झाला ...
नाशिक : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी सध्या अस्वच्छता करणारे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाईचा जेार सुरू झाला आहे, परंतु ही करवाई करताना सार्वजनिक ठिकाणी आणि शासकीय कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात बिडी-सिगारेटसारखे धूम्रपान करणाऱ्यांना जणू सूट मिळाली आहे. महापालिकाच नव्हे, तर तब्बल २२ यंत्रणांना या संदर्भात कारवाईचे अधिकार असले, तरी अशा प्रकारची कारवाई करण्याबाबत अनास्था आहे.
धूम्रपान करणे हे आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे अशा प्रकारे बिडी-सिगारेट करणाऱ्यांना कर्करेागासारखे अनेक त्रास होतोच, परंतु त्यांच्या सान्निध्यात असणाऱ्यांनाही श्वसन आणि अन्य प्रकारचे त्रास हाेतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे. तसे फलक शासकीय कार्यालये, महाविद्यालये, बस आगार अशा अनेक ठिकाणी असतात, परंतु त्यानंतरही या सर्वच ठिकाणी सर्रास धूम्रपान सुरू असते. ‘लोकमत’ने शहराच्या विविध भागांत केलेल्या पहाणीत हा प्रकार आढळला आहे.
कायद्यानुसार अशा प्रकारे धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार हे महापालिका, पोलीस, महाविद्यालयांचे प्राचार्य, अन्न व औषध विभाग, बस आगाराचे आगार प्रमुख अशा तब्बल वीस ते बावीस यंत्रणांना अधिकार आहे, परंतु अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी उदासीन असल्याचे दिसत आहे. शासकीय कार्यालयांत अनेक ठिकाणी सीसीटीव्ही असल्याने थेट इमारतीत नाही, परंतु बस स्थानकासारख्या ठिकाणी मात्र सर्रास धूम्रपान सुरू आहे. महापालिकेने सध्या केवळ कोरोनावर लक्ष केंद्रित करताना थुंकीबहाद्दरांकडून दंड वसूल केला आहे.
...........
७४ थुंकीबहद्दरांवर मनपाने केली कारवाई
महापालिकेने थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. यात गुटखा, पान, तंबाखू आणि तत्सम पदार्थ खाऊन थुंकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, त्यात धूम्रपान करणाऱ्यांवरील कारवाईचा समावेश नाही. सध्या थुंकणाऱ्यांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकत असल्याने, अशा व्यक्तींवर प्राधान्याने कारवाई केली जात आहे, अशी माहिती मनपाच्या डॉ.कल्पना कुटे यांनी दिली.
.......
‘अन्न, औषध’ला दंडाचे अधिकार प्राप्त
यापूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाला धूम्रपानाबाबत कारवाईचे अधिकार प्राप्त होते. मात्र, आता वीस ते बावीस प्राधीकृत यंत्रणा असून, त्या आपल्या स्तरावर व अधिकारात कारवाई करू शकतात, अशी माहिती नाशिकचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी दिली.
.............
बिडी-सिगारेट ओढल्याचे धोके
धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग हेाण्याचा धोका अधिक असून, ते प्राणावरही बेतू शकते. श्वसनाचे विकार हे प्रामुख्याने होत असले, तरी धूम्रपान करणाऱ्यांना जसे विकार होतात, तसे विकार त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्यांना अधिक प्रमाणात हेातात. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.