नाशिकमध्ये अग्नितांडव; युवक होरपळून ठार, मॉलमध्ये लाखोंचा माल बेचिराख
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 11:15 PM2022-06-19T23:15:01+5:302022-06-19T23:15:49+5:30
मॉलला लागलेली आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अद्यापही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
नाशिक : शहरासाठी रविवार (दि.१९) हा ‘अग्नि’वार ठरला. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हॅप्पी होम कॉलनीमध्ये रो-हाऊसमध्ये आगीचा भडका उडाला. त्यापाठोपाठ मास्टर मॉलमध्येही आग भडकली. दोन्ही ठिकाणी लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. रो-हाऊसमध्ये लागलेल्या आगीत युवकाचा होरपळून मृत्यू झाला. मॉलमध्ये दोन तासांपेक्षा अधिक वेळ सुरू असलेल्या आगीच्या तांडवामध्ये इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून राख झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. मॉलला लागलेली आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अद्यापही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
पुणे महामार्गावरील बजरंगवाडीशेजारी असलेल्या हॅप्पी होम कॉलनीत राजगृह नावाचे उत्तम काळखैरे यांचे एक मजली राे-हाऊस आहे. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानकपणे त्यांच्या घरावरील बेडरूममध्ये धुराचे लोट उठले आणि यावेळी घरात असलेला त्यांचा तरुण मुलगा मयूर काळखैरे (३१) हादेखील आगीपासून स्वत:ला वाचविण्यासाठी ओरडू लागला. आजूबाजूच्या रहिवाशांनी व त्यांनी वरच्या मजल्यावर धाव घेत बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र दरवाजा आतून बंद असल्याने काहीही केल्याने उघडणे शक्य नव्हते. जागरूक नागरिकांनी त्वरित ‘डायल-११२’हेल्पलाइनसह अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवान आणि १०८च्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून पाण्याचा मारा करत आग विझविली. यावेळी बेडरूममधील सर्व वस्तू बेचिराख झालेल्या होत्या. तसेच मयूरदेखील आगीत मोठ्या प्रमाणात भाजल्याने मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले. त्वरित मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मास्टर मॉलमध्ये ऊसळला आगडोंब!
रविवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास मास्टर मॉलमध्ये आगडोंब उसळला. जुन्या तीन मजली इमारत असलेल्या मॉलच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. रविवार सुटी असल्याने मॉल बंद होते. घटनेची माहिती संध्याकाळी शिंगाडा तलाव येथून अग्निशमन दलाचे बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. मॉलच्या चौहोबाजूंनी दाट लोकवस्ती व झोपडपट्टीचा परिसर आहे. तसेच अरुंद गल्लीबोळामुळे आग विझविताना अडथळे निर्माण होत होते. जवानांकडून पाण्याचा मारा करत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले; मात्र आग वरच्या मजल्यावर असल्यामुळे धुमसत होती. तासाभरात आगीने रौद्रावतार धारण केला आणि मॉलच्या पाठीमागील बाजूने भीमवाडीच्या दिशेने असलेल्या मॉलच्या भिंतीच्या जाळ्या असलेल्या छिद्रांमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला आकाशात उठत होत्या. संध्याकाळी ६ वाजेपासून लागलेली आग रात्री साडे 10 वाजेपर्यंत नियंत्रणात आलेली नव्हती. शिंगाडा तलाव येथील दोन पंचवटी, कोणार्कनगर, सातपूर येथील प्रत्येकी एक अशा पाच बंबांच्या साहाय्याने जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर रात्री उशिरा नियंत्रण मिळविले. यावेळी झालेली बघ्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी भद्रकाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी घटनास्थळी दाखल होत पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. या घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जळून राख झाले.