शिवसेनेला मोठी आशा; मनसेचा भ्रमनिरास ?
By Admin | Published: February 19, 2017 12:17 AM2017-02-19T00:17:12+5:302017-02-19T00:17:25+5:30
शिवसेनेला मोठी आशा; मनसेचा भ्रमनिरास ?
सिडको : अनेक विद्यमान नगरसेवकांनी सोडलेल्या साथीमुळे जर्जर झालेल्या मनसेचा राजकीय लाभ उठविण्यासाठी शिवसेना सिडकोत मोठी आशा बाळगून आहे, अगदी त्याचप्रमाणे गेल्या निवडणुकीत एकही जागा न मिळालेली भाजपादेखील यंदाच्या निवडणुकीत चमत्काराच्या आशेवर आहे. अशा अस्थिर राजकीय परिस्थितीत कॉँग्रेस आघाडीदेखील दावा करीत असली तरी, सिडकोत भाजपा व शिवसेनेत उमेदवारीवरून झालेली बंडखोरी लक्षात घेता, त्याचा फटकाही तितकाच सहन करावा लागणार आहे. गेल्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक या भागातून निवडून आले, त्याचबरोबरीने सेनेलाही यश मिळाले. विशेष म्हणजे मनसेने हा विजय संपादन करताना सेना व भाजपाच्याच ताब्यातील जागा हिसकावून घेतल्या होत्या, त्यामुळे मनसेचा फटका सेना-भाजपालाच बसला, परिणामी भाजपा गेल्या निवडणुकीत सिडकोतून खाते सुद्धा उघडू शकली नाही. त्यामानाने कॉँग्रेस व राष्ट्रवादीने तिसरा क्रमांक कायम ठेवला होता. माकपाने एक जागा राखून अस्तित्व कायम ठेवले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीचा परिणाम सिडकोतील राजकारणावर झाला. मनसेबरोबर पाच वर्षेही नगरसेवक राहू शकले नाहीत, अनेकांनी निवडणुकीच्या तोंडावर सेना, भाजपाला जवळ केले, परिणामी मनसे जर्जर झाली. या पक्षाने यंदाच्या निवडणुकीत सर्व प्रभागात उमेदवार दिले असले तरी, त्यांची लढाई पूर्वीच्या मनसे व विद्यमान सेनेच्या नगरसेवकांशी होत असल्यामुळे त्यांचा टिकाव लागणे कठीण आहे. शिवसेनेला अच्छे दिन येतील अशी आशा बाळगून निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या भरतीमुळे ताकद वाढल्याचे दिसत असले तरी, त्यातून झालेली बंडखोरी पक्षासाठी घातक ठरण्याची शक्यता अधिक आहे. तथापि, सेनेने हा धोका ओळखून अधिकाधिक लक्ष सिडकोवर केंद्रित केले असून, राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचारसभांच्या माध्यमातून वातावरण निर्मितीत सेना पुढे निघून गेली आहे. गेल्या निवडणुकीत सिडकोवासीयांनी साफ नाकारलेल्या भाजपाने यंदा केंद्र व राज्यातील सत्तेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ताकद अजमाविण्याचा प्रयत्न चालविला असून, काही प्रमाणात त्यांना यश मिळण्याची आशा आहे. सेनेप्रमाणे भाजपालाही बंडखोरीने ग्रासल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक मात्र खरे भाजपा खाते उघडेल यावर जाणकारांचे एकमत आहे.